घरमुंबईहे निकाल म्हणजे सत्ताधाऱ्यांना धडा - उद्धव ठाकरे

हे निकाल म्हणजे सत्ताधाऱ्यांना धडा – उद्धव ठाकरे

Subscribe

विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षित निकाल लागल्यानंतर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मित्रपक्ष भाजपला शेलक्या शब्दांमध्ये सुनावलं आहे.

‘ईव्हीएममधून फक्त कमळेच बाहेर येतील असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटपर्यंत वाटत होता. पण त्यांच्या १६४ पैकी ६३ कमळे फुललीच नाहीत. शिवसेना आणि भाजपला मिळून १६०च्या आसपास आकडा आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवून दिलेला हा निकाल आहे. त्याला महाजनादेश म्हणा किंवा आणखी काही. पण हा महाजनादेश नाही हे मान्य करावं लागेल. जनतेचा कौल स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा दाखवावाच लागतो. आम्ही हा जनादेश स्वीकारला आहे’, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. ‘२०१४पेक्षा यंदा निकाल वेगळा लागला आहे. २०१४मध्ये युती नव्हीत. पण २०१९मध्ये युती असून देखील जागांची घसरण झाली. बहुमत मिळालं, पण काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून १०० जागांचा टप्पा गाठला. हा एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना मिळालेला धडा आहे’, असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.


हेही वाचा – आता फॉर्म्युला फिप्टी फिप्टीच!

विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुतीला २००पार जागा मिळतील अशा राणा भीमदेवी थाटात गर्जना करणाऱ्या महायुतीला मतदारांनी जमिनीवर आणून सोडलं. भाजपचा स्वबळावर १४०पेक्षा जास्त जागांचा आराखडा पार धुळीला मिळाला. इतकंच काय, तर मागच्या निवडणुकांपेक्षाही या निवडणुकीत भाजपच्या तब्बल १८ जागा घटल्या. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अनपेक्षित यश मिळालं आहे. त्यामुळे भाजपचा विजयवारू थांबला नसला, तरी त्याची गती या निवडणुकीच प्रचंड मंदावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामना या मुखपत्रातून भाजपला जनमताचा मान राखण्याविषयी सुनावलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीची सर्वात जास्त उसळी

दरम्यान, या अग्रलेखातून शरद पवारांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं आहे. ‘भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस अशी काही फोडली, की पवारांचा हा पक्ष तोळामांसाचा तरी शिल्लक राहील का? असा माहौल निर्माण झाला. पण महाराष्ट्रात सर्वात जास्त उसळी राष्ट्रवादीने मारली आहे. त्यांनी पन्नाशी पार केली. भाजप १२२ वरून १०२वर घसरला आणि शिवसेना ६३ वरून खाली आली. इतरही सर्व पक्षांना मिळून २५ जागा मिळाल्या. त्यामुळे हा कौल खरंतर अधांतरी आहे. फार शहाणपणा करू नका. उतू नका, मातू नका. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा असा दनादेश जनतेनं दिला आहे’, असं अग्रलेखात नमूद केलं आहे.

भ्रमाचा भोपळा जनतेनं फोडला

या अग्रलेखामध्ये शिवसेनेने आयाराम-गयारामांच्या जोरावर सत्तेचं स्वप्न पाहाणाऱ्या भाजपला टोला लगावला आहे. ‘पक्ष फोडून आणि पक्षांतरे घडवून मोठा विजय मिळवता येतो हा भ्रमाचा भोपळा राज्याच्या जनतेनं फोडला. पक्षांतरे करून टोप्या बदलणाऱ्यांना जनतेनं घरी पाठवलं आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा दारूण पराभव झाला आहे. शिवरायांचे वंशज म्हणून कॉलर उडवत फिरणाऱ्या उदयनराजेंचं वर्तन नीतिमत्तेचं असायला हवं होतं. छत्रपतींचं नाव घेऊन कुणी अल्टी-पल्टी करत असेल, तर चालणार नाही, हे सातारकरांनी दाखवून दिलं. हा उदयनराजेंचा व्यक्तिगत पराभव आहे’, असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -