बॅड न्यूज : चिनी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची निर्मिती!

चीनच्या शास्त्रज्ञाचा दावा

chinese virologist vows publish evidence coronavirus man made tata

कोरोना विषाणूच्या निर्मितीबाबत सारे जग चीनकडे संशयाने बघत असताना आता चीनच्या प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यांनी केलेल्या दाव्यानुसार चिनी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची निर्मिती झाली असून आपण लवकरच याबद्दल पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे जीवाच्या भीतीने मेंग यांनी चीनमधून पळ काढत अमेरिकेचा आश्रय घेतलाय.

जागतिक आरोग्य संघटना चीनची पाठराखण करत असली तरी चीननेच कोरोनाचा विषाणू तयार केला असल्याचा आरोप अमेरिकेसह युरोपमधील बड्या देशांनी सातत्याने केला आहे. याला चिनी शास्त्रज्ञाच्या दाव्यामुळे संशयाची सुई चीनच्या दिशेने झुकली आहे.‘कोरोनाची महासाथ पसरली नव्हती तेव्हाच चीन सरकारला याबाबतची माहिती मिळाली होती. चीन सरकारने आपल्याबाबतची सर्वच माहिती मिटवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

वुहानच्या बाजारातून कोरोनाचा फैलाव झाला असल्याच्या बातम्या या दिशाभूल करणार्‍या आहेत. आपण लवकरच एक अहवाल प्रसिद्ध करणार असून कोरोनाचा विषाणू हा मानवनिर्मित असल्याचा पुरावा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. यान यांनी सांगितले की, वुहानचा मांस बाजार हा एखाद्या पडद्यासारखा वापरण्यात आला आहे. या पडद्यामागे बर्‍याच घडामोडी झाल्या आहेत. हा विषाणू नैसर्गिक नाही. वुहानच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर आला असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, जीनोमचा सिक्वेन्स हा माणसाच्या बोटांच्या ठश्यासारखा आहे. या आधारावर त्याची ओळख पटवता येऊ शकते. भक्कम पुराव्याच्या आधारे हा विषाणूच्या प्रयोगशाळेतून आला असल्याचे सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले.

डॉ. यान म्हणाल्या, त्यांची माहिती चीनच्या सरकारी डेटाबेसमधून हटवण्यात आली आहे. सहकार्‍यांना माझ्याविरोधात अफवा पसरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंचा अभ्यास करणार्‍या पहिल्या काही मोजक्या शास्त्रज्ञांपैकी आपण एक असल्याचे त्यांनी म्हटले. चीन सरकार आपल्या जीवावर उठले असून हाँगकाँगमधून अमेरिकेत स्थलांतरीत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चीनने कोरोनाचा विषाणू वुहान येथील प्रयोगशाळेत बनवला असल्याचा आरोप याआधीदेखील अनेकदा फेटाळून लावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावासमोर झुकत चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला चौकशी करण्यासाठी चीनमध्ये प्रवेश दिला. वुहान प्रयोगशाळेच्या संचालकांनीही कोरोना विषाणू प्रयोगशाळेत निर्मित झाला नसल्याचे म्हटले आहे.