तिशी ओलांडली?, काळजी घ्या.

Mumbai

करिअर, संसार सांभाळताना महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातच जलद, पाश्चात्य जीवनशैलीचा अंगीकार केल्याने स्त्रियादेखील आता विविध गंभीर आजारांना बळी पडताना दिसत आहेत. तेव्हा आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तिशीनंतर महिलांनी काही महत्त्वपूर्ण चाचण्या करून घेणे महत्त्वाचे ठरते.

ब्रेस्ट कॅन्सर
महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे गंभीर आजार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. एकदा का तिशी उलटली की प्रत्येक स्त्रीने ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत जागरूक असणं आवश्यक असतं. घरच्या घरी स्वतःच काही प्राथमिक चाचणी केल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कळतो. महिलांनी स्वत:च आपली ब्रेस्ट चेक करणं आवश्यक आहे. म्हणजे काखेत कोणत्याही स्वरूपाची गाठ नाही ना, ब्रेस्टचा आकार किंवा त्वचेत काही बदल झाले आहेत का? निपल्समधून पाणी येणे किंवा दुखणे, खाज येणे अशी काही लक्षणं दिसल्यास ताबडतोब एमआरआय किंवा मेमोग्राफी करणं आवश्यक आहे. तसेच तुमच्या कुटुंबात कोणाला अशा स्वरूपाचा आजार असल्यास तुम्ही दरवर्षी ही चाचणी करून घेणं आवश्यक आहे.

अ‍ॅनिमिया
भारतात कष्टकरी महिलांचे प्रमाण अधिक आहे. आहार पाण्याकडे दुर्लक्ष केल्याने तिशीनंतर महिलांना गंभीर स्वरूपाचे आजार ग्रासतात. त्यातीलच एक म्हणजे अ‍ॅनिमिया. देशातील बहुतांश महिलांमध्ये रक्ताची कमतरता जाणवते. अनावश्यक थकवा जाणवू लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं जमा होतात. नखं आणि डोळे अधिक पांढरे होतात. म्हणूनच वर्षातून एकदा सीबीसी (कम्पलीट ब्लड काऊंट) ही चाचणी करणं आवश्यक आहे. तसेच रोजच्या जेवणात महिलांनी लोहयुक्त वस्तू उदा. पालक, गाजर, बीट, सफरचंद, केळं, खजूर किंवा गुळाचा समावेश करावा.

उच्च रक्तदाब
तणावपूर्ण जीवनशैलीमुळे हल्ली स्त्रियाही उच्च रक्तदाबाला बळी पडत आहेत. मेनोपॉजच्या अवस्थेमध्ये हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच नियमित रूपात रक्तदाबाची चाचणी करणं आवश्यक आहे. वजन अधिक असल्यास किंवा परिवारात हा आजार असल्यास विशेष काळजी घेत डॉक्टरांकडून योग्य आहाराचा सल्ला घ्यावा.

थायरॉईड
थायरॉईडच्या ग्रंथी गळ्याच्या खालच्या बाजूला असून त्यात टी-३, टी-४ असे स्रव स्त्रवत असतात. त्यांची मात्रा असंतुलित झाल्यास त्याचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होतो. परिणामी झटक्यात वजन वाढणं किंवा कमी होणं, थकवा येणे, त्वचा कोरडी होणे, चिडचिड होणे, उदास होणे, स्मरणशक्ती कमी होणे अशी लक्षणं नजरेस येतात. गर्भावस्थेत थायरॉडसंबंधी समस्या आढळल्यास नवजात शिशूलाही त्रास होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच तुमच्यामध्ये यापैकी कोणतंही लक्षण दिसल्यास ताबडतोब थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन्सची चाचणी करून घ्यावी.

मधुमेह
वजन वाढले असेल किंवा कुटुंबात कोणाला मधुमेह असल्यास आणि तुम्हाला उच्च रक्तदाब असल्यास तुम्ही तुमच्या शरीराची विशेषत्वाने काळजी घेणं आवश्यक आहे. तीस वर्षांनंतर तर वर्षातून एकदा तरी रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here