घरलाईफस्टाईलबायपास शस्त्रक्रियेनंतरही रक्तवाहिन्यांमध्ये होतात गुठळ्या !

बायपास शस्त्रक्रियेनंतरही रक्तवाहिन्यांमध्ये होतात गुठळ्या !

Subscribe

तुमची बायपास शस्त्रक्रिया झाली आणि तुम्हाला बरे वाटू लागले म्हणजे तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा विकार बरा झाला, असे नाही. शस्त्रक्रियेनंतरही तुम्हाला हृदयातील रक्तावाहिन्यांच्या विकारावर उपचार करावेच लागतील आणि तुमचे नवे बायपास ग्राफ्ट्स वाचविण्यासाठी तुम्हाला आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी लागेल.

बायपास शस्त्रक्रियेनंतर दोन प्रकारच्या गुठळ्या होतात. पहिल्या प्रकारच्या गुठळ्या मूळ रक्तवाहिनीतील रक्ताभिसरणामध्ये होतात आणि दुसरा प्रकार म्हणजे नव्या बायपास ग्राफ्ट्समध्ये या गुठळ्या होतात. पुन्हा होणार्‍या गुठळ्या बहुघटकीय असतात.

प्रथम आपण नव्या बायपास ग्राफ्ट्सविषयी जाणून घेऊ या. बायपास करोनरी अर्टरीमध्ये (हृदयातील रक्तवाहिनी) विविध प्रकारचे ग्राफ्ट्स वापरण्यात येतात. तुमच्यावर कोणती शस्त्रक्रिया करण्यात आली, यावरून बायपास शस्त्रक्रियेचे आयुर्मान ठरत असते. यासाठी कोणतेही गणितीय नियम लागू होत नाहीत. सेफॅनस व्हेन ग्राफ्ट जो तुमच्या पायातून घेतलेला असतो, त्यात तुलनेने लवकर गुठळ्या होतात. शस्त्रक्रियेच्या साधारण ८-१० वर्षांनी या गुठळ्या होत असल्याचे आढळून आले आहे. तुमच्या हातातून आणि तुमच्या छातीच्या आतील भागातून घेतलेल्या आर्टरिअल ग्राफ्ट्सचे आयुर्मान अधिक असते. इंटर्नल मॅमरी अर्टरीमधून घेतलेला ग्राफ्ट हा सर्वोत्तम असतो. शस्त्रक्रियेनंतर २० वर्षांनीही तो ८८-९०% खुला असल्याचे आढळून आले आहे. ही रक्तवाहिनी आपल्या छातीच्या पडद्याच्या आता छातीच्या हाडाच्या दोन्ही बाजूंना असते. आम्ही आता सर्व रुग्णांमध्ये हृदयातील सगळ्या रक्तवाहिन्यांना बायपास करण्यासाठी बायलॅटरल इंटर्नल मॅमरी अर्टरीचा वापर करण्यात येतो. शस्त्रक्रियेनंतर २०-२५ वर्षांनीसुद्धा हा ग्राफ्ट टिकून राहतो. हृदयाच्या गरजेनुसार तो विस्फारतो, या ग्राफ्टमधून भरपूर प्रमाणात वाहिनी विस्फारक रेणू स्त्रवतात, म्हणूनच बायपास शस्त्रक्रिया ग्राफ्ट्सचा राजा, असे याला म्हटले जाते.

- Advertisement -

हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये होणार्‍या नव्या गुठळ्यांबद्दल-

यापूर्वी नमूद केल्यानुसार तुमच्या हृदयातील रक्तवाहिन्यांचा आजार बळावू नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत. अनेक घटकांवर आपल्याला नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. याची सुरुवात आपण जीवनशैलीपासून करायला हवी.

1. धुम्रपान वर्ज्य करा- अनेक अभ्यासांती दिसून आले आहे की, धुम्रपान वर्ज्य केल्याने हृदयाच्या दुसर्‍या बायपास शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता बर्‍यापैकी कमी होते.
2. योग्य औषधे घेऊन तुमच्या रक्तातील कोलेस्टरॉलची पातळी १०० मिग्रॅ/डेसिलिटर एवढी ठेवा.
3. तुमचा रक्तदाब ११०/७० एमएम एचजी या सामान्य पातळीवर असायला हवा.
4. दररोज अ‍ॅस्प्रिनचा कमी डोस घेतल्यास नव्या गुठळ्या होण्यास किंवा बायपास ग्राफ्ट्समध्ये गुठळ्या विकसित होण्याचे प्रमाण कमी होईल.
5. तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून उपयुक्त कोलेस्टेरॉल वाढविणारा आणि घातक कोलेस्टरॉलची पातळी करणारा आहार घ्या. उदा. मासे हे रक्तात उपयुक्त कोलेस्टरॉलची पातळी वाढवतात. त्याचप्रमाणे अनेक भाज्या व फळे उपलब्ध आहेत. मात्र, लाल मांस आहारात घेणे टाळा.
6. दरररोज किमान ४० मिनिटे चाला किंवा व्यायाम करा.
7. वजन कमी केल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होईल.
8. मधुमेहाची नियमित तपासणी करून घ्या.
9. तणावाचे व्यवस्थापन करा.

- Advertisement -

एकूणच, तुम्हाला बायपास शस्त्रक्रियेचे फायदे जतन करण्यासाठी सक्रिय भूमिका निभावावी लागणार आहे. दुसरी बायपास शस्त्रक्रिया टाळण्यासाठी खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याविषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. बायपास शस्त्रक्रियेचे दीर्घकालीन लाभ घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरसोबत नियमित पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

-डॉ.बिपिनचंद्र भामरे (कार्डिओ-थोरॅसिक सर्जन)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -