सावरीच्या झाडावरची अनोखी दहीहंडी

बदलापूरमध्ये आदिवासींची जपली परंपरा

Mumbai

आठ ते नऊ थरांचे मानवी मनोरे आणि उंचावरील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमधील चुरस असे चित्र शनिवारी मुंबई ठाण्यामध्ये दिसत होते. मात्र ठाणे शहराजवळ असलेल्या बदलापूरमध्ये शनिवारी अनोख्या पद्धतीने हंडी पोडण्यात आली. बदलापूरमधील आदिवासींनी सावरीच्या झाडाला हंडी बांधून अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला. अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे.

बदलापूरजवळील चोण गावातल्या ठाकूरवाडी येथे सुमारे ३५० आदिवासी राहतात. काळ बदलत असला तरी त्यांनी आपल्या प्रथा, परंपरा जपल्या आहेत. आदिवासी सावरीच्या झाडाला दहीहंडी बांधतात. त्यापूर्वी झाडाची साल काढली जाते. त्यामुळे ते झाड चिकट गुळगुळीत होते. मग त्या झाडावर चढून वर लावलेली हंडी फोडली जाते. साल काढल्यामुळे चिकट व गुळगुळीत झालेल्या झाडावर चढणे फार कठीण होते. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर ही हंडी फोडण्यात यश येते. त्यामुळे ही हंडी फोडताना पाहणे मजेशीर ठरते. आदिवासी समाज मोठ्या उत्साहात यामध्ये सहभागी होतात. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्या हस्ते या हंडीचे पूजन करून दहीहंडी उभारण्यात आली. यावेळी देशमुख यांनी हंडीत थरांची स्पर्धा न करता या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटण्याच्या आदिवासी बांधवांच्या दहीहंडीच्या या अनोख्या परंपरेचे कौतुक केले.