हिटमॅन वनडेत सर्वोत्तम!

Mumbai
रोहित शर्मा

मागील वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८ सामन्यांत ७ शतकांसह १४०९ धावा चोपून काढणार्‍या भारताच्या रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सन्मान करण्यात आला आहे. आयसीसीने रोहितला २०१९ वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे. तसेच विराट कोहलीची आयसीसीच्या २०१९ वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावला.

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहितने मागील वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी केली. खासकरून इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला. या स्पर्धेच्या ९ सामन्यांत त्याने पाच शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक ६४८ धावा फटकावल्या. एका विश्वचषकात पाच शतके करणारा रोहित हा पहिला फलंदाज ठरला. तसेच त्याने मागील वर्षीच्या पहिल्या (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) आणि अखेरच्या (वेस्ट इंडिजविरुद्ध) एकदिवसीय मालिकेत शतक झळकावण्याची किमया साधली. माझ्या कामगिरीचे अशाप्रकारे कौतुक झाल्याचा आनंद आहे. आम्ही संघ म्हणून २०१९ मध्ये अप्रतिम कामगिरी केली. आम्हाला अजूनही चांगला खेळ करता आला असता, पण आमच्यासाठी बर्‍याच सकारात्मक गोष्टी घडल्या आणि २०२० वर्षासाठीही आम्ही उत्सुक आहोत, असे पुरस्कार मिळाल्यानंतर रोहित म्हणाला.

इंग्लंडचा बेन स्टोक्स मागील वर्षीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला. इंग्लंडने मायदेशातच जिंकलेल्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात स्टोक्सने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने नियमित सामन्यात ९८ चेंडूत ८४ धावा, तर त्यानंतरच्या सुपर ओव्हरमध्ये ३ चेंडूत ८ धावा फटकावल्या. कसोटी क्रिकेटमध्ये हेडिंग्ले येथे झालेल्या अ‍ॅशेस सामन्याच्या चौथ्या डावात ३५९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची ९ बाद २८६ अशी अवस्था होती. मात्र, स्टोक्सने (नाबाद १३५ धावा) इंग्लंडला अशक्यप्राय वाटणार विजय मिळवून दिला. दुसरीकडे १२ सामन्यांत ५९ मोहरे टिपणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स २०१९ वर्षाचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू ठरला. टी-२० सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीची पुरस्कार भारताच्या दीपक चहरने मिळवला. त्याने बांगलादेशविरुद्ध नागपूरला झालेल्या सामन्यात ७ धावांच्या मोबदल्यात हॅटट्रिकसह ६ गडी बाद करत भारताला विजय मिळवून दिला होता.

पुरस्कार मिळालेले खेळाडू :

सर्वोत्तम क्रिकेटपटू – बेन स्टोक्स (इंग्लंड)
सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू – पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू – रोहित शर्मा (भारत)
सर्वोत्तम उद्योन्मुख क्रिकेटपटू – मार्नस लबूशेन (ऑस्ट्रेलिया)
स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार – विराट कोहली (भारत)
सर्वोत्तम टी-२० कामगिरी – दीपक चहर (७ धावांत ६ बळी वि. बांगलादेश)
असोसिएट देशांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू- कायेल कॉट्झर (स्कॉटलंड)
सर्वोत्तम पंच – रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)

आयसीसीचे २०१९ वर्षातील सर्वोत्तम संघ :

एकदिवसीय – रोहित शर्मा, शाई होप, विराट कोहली (कर्णधार), बाबर आझम, केन विल्यमसन, जॉस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

कसोटी – मयांक अगरवाल, टॉम लेथम, मार्नस लबूशेन, विराट कोहली (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, निल वॅग्नर, नेथन लायन.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here