क्रिकेटपटू व्हर्नोन फिलँडरच्या भावाची गोळ्या घालून हत्या 

ही घटना दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे घडली.

vernon philander
व्हर्नोन फिलँडर

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू व्हर्नोन फिलँडरच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे घडली, असे फिलँडर कुटुंबाकडून सांगण्यात आले. व्हर्नोनचा धाकटा भाऊ टायरॉन फिलँडरची त्यांच्या घरापासून काहीच अंतरावर हत्या करण्यात आली. शेजाऱ्यांना पाणी देत असताना टायरॉनला गोळ्या घालण्यात आल्या आणि यात त्याने प्राण गमावल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेतील मीडियाने दिली आहे. ‘आम्हाला अजून यावर विश्वास बसत नाही,’ असे फिलँडर कुटुंबियांना काढलेल्या पत्रकात व्हर्नोन म्हणाला.

या घटनेबाबत आम्हाला अजून पूर्ण माहिती मिळालेली नाही आणि या दुर्दैवी घटनेबाबत जितकी चर्चा होत राहील, तितका आम्हाला जास्त त्रास होईल, असेही व्हर्नोन फिलँडरने सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना बुधवारी दुपारी घडली आणि हत्येचा तपास सुरु आहे. मात्र, अजून कोणालाही अटक झालेली नाही. तसेच फिलँडरच्या घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार, गोळ्यांचा आवाज आला तेव्हा व्हर्नोनची आई आणि कुटुंबातील इतर काही सदस्य हे त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला होते.

३५ वर्षीय व्हर्नोन फिलँडरने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. चेंडू स्विंग करण्यासाठी तो ओळखला जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेचे ६४ कसोटी, ३० एकदिवसीय आणि ७ टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले. ज्यात त्याने अनुक्रमे २२४, ४१ आणि ४ विकेट घेतल्या.