मी कर्णधार बनण्यामध्ये धोनीची भूमिका महत्त्वाची!

विराट कोहलीचे उद्गार

Mumbai

महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांची भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणना होते. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन विश्वचषक जिंकले. तर कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ मागील २-३ वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. कर्णधार बनण्याआधी कोहली बरीच वर्षे धोनीच्या नेतृत्वात खेळला. कोहलीतील नेतृत्व गुण धोनीने खूप आधीच हेरले होते आणि म्हणूनच त्याने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. तर २०१९ विश्वचषकाआधी दोन वर्षे कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी कर्णधार बनण्यामध्ये धोनीची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे मतकोहलीने व्यक्त केले.

भारतीय संघात दाखल झाल्यापासूनच मला काहीतरी नवीन शिकत राहायचे होते. मी नेहमीच मैदानात धोनीसोबत संवाद साधायचो. मी त्याला काहीतरी वेगळे सुचवायचो आणि तो बर्‍याचदा विरोध करायचा. मात्र, त्याला मी सांगितलेली कल्पना आवडली, तर तो नक्कीच त्याबाबत माझ्याशी चर्चा करायचा. तो सतत माझ्यावर लक्ष ठेवून असायचा. मी नेहमीच त्याच्याकडून शिकायचा प्रयत्न करायचो. त्यालाही हळूहळू असा विश्वास वाटू लागला की, मी पुढे जाऊन भारतीय संघाचे नेतृत्व करु शकतो. निवडकर्त्यांनी अचानकच माझी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड केली नाही. त्यांनी मला कर्णधारपदाची सूत्रे देण्याआधी धोनीशी बहुदा चर्चा केली असेल. त्यामुळे मी कर्णधार बनण्यामध्ये धोनीची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे कोहली ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनशी चर्चा करताना म्हणाला. या दोघांनी इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

कोहलीची पहिल्यांदा २०१२ आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिका आणि तिरंगी मालिकेसाठीही तोच उपकर्णधार होता. ती कसोटी मालिका भारताने ०-४ अशी गमावली होती. कोहलीने मात्र आपली छाप पाडत अ‍ॅडलेड येथे झालेल्या सामन्यातकसोटी क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले होते. या दौर्‍यानंतर माझा आत्मविश्वास अधिकच वाढला आणि मला माझा खेळ अधिक चांगल्याप्रकारे कळला असे कोहलीने सांगितले.

पाकविरुद्धची खेळी माझ्यासाठी गेम-चेंजर

२०१२ आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध केलेली १८३ धावांची खेळी माझ्यासाठी गेम-चेंजर ठरली, असे विराट कोहली म्हणाला. पाकिस्तानकडे शाहिद आफ्रिदी, सईद अजमल, उमर गुल, एझाज चीमा आणि मोहम्मद हाफिज असे अप्रतिम गोलंदाज होते. पहिल्या २०-२५ षटकांत गोलंदाजांना खूप मदत मिळत होती. त्यामुळे फलंदाजी करणे खूप अवघड होते, पण त्यावेळी सचिन तेंडुलकर सोबत असल्याने मला खूप मदत झाली. ती त्यांची अखेरची खेळी होती आणि त्यांनी अर्धशतक केले. तसेच आम्ही १०० धावांची भागीदारी रचली होती. त्यामुळे ती खेळी माझ्यासाठी अविस्मरणीय आणि गेम-चेंजर होती, असे कोहलीने सांगितले. पाकिस्तानने त्या सामन्यात भारतासमोर ३३० धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान कोहलीच्या उत्कृष्ट खेळीमुळे ४७.५ षटकांत पूर्ण केले.