घरक्रीडागुजरातचा उपांत्य फेरीत प्रवेश

गुजरातचा उपांत्य फेरीत प्रवेश

Subscribe

गोव्याचा उडवला ४६४ धावांनी धुव्वा,रणजी करंडक

डावखुरा फिरकीपटू सिद्धार्थ देसाईने दुसर्‍या डावात घेतलेल्या ५ विकेटच्या जोरावर गुजरातने रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत तुलनेने दुबळ्या गोव्याचा ४६४ धावांनी धुव्वा उडवला. चौथ्या डावात ६२९ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना गोव्याचा डाव अवघ्या १६४ धावांत आटोपला. सिद्धार्थ देसाईने ८१ धावांच्या मोबदल्यात गोव्याचा निम्मा संघ गारद केला. त्याला वेगवान गोलंदाज अर्झान नागवासवालाने १८ धावांत ४ गडी बाद करत उत्तम साथ दिली.

सरदार पटेल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कर्णधार पार्थिव पटेल (१२४) आणि रुश कलारिया (नाबाद ११८) यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे गुजरातने पहिला डाव ८ बाद ६०२ धावांवर घोषित केला. याचे उत्तर देताना गोव्याला पहिल्या डावात केवल १७३ धावा करता आल्या. गुजरातने आपल्या डावात १९९ धावा करत गोव्यासमोर सामना जिंकण्यासाठी ६२९ धावांचे आव्हान ठेवले.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना गोव्याने पहिल्या ३ विकेट १३ धावांतच गमावल्या. यानंतर स्नेहल कौठणकर (१७) आणि सुयश प्रभुदेसाई (६६) यांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचत ही पडझड थांबवली. मात्र, या दोघांनाही सिद्धार्थ देसाईने माघारी पाठवले. पुढे दर्शन मिसळ (नाबाद ४६) वगळता इतरांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही आणि गोव्याचा डाव १६४ धावांत आटोपला.

कर्नाटकाला आघाडी!

- Advertisement -

गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरविरुद्ध रणजी सामन्याच्या पहिल्या डावात कर्नाटकाला आघाडी मिळाली. या सामन्यात कर्नाटकाचा पहिला डाव २०६ धावांत आटोपला. याचे उत्तर देताना जम्मू आणि काश्मीरचा संघ ४ बाद १४४ असा सुस्थितीत होता. मात्र, त्यांनी अखेरच्या ६ विकेट ४८ धावांतच गमावल्याने त्यांचा डाव १९२ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे कर्नाटकाला १४ धावांची आघाडी मिळाली. त्यांच्या प्रसिध कृष्णाने ४ बळी घेतले. कर्नाटकाची चौथ्या दिवसअखेर दुसर्‍या डावात ४ बाद २४५ अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे २५९ धावांची आघाडी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -