पृथ्वी शॉची पुन्हा सरावाला सुरुवात

Mumbai
Prithvi Shaw
पृथ्वी शॉ

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक मालिका विजयाला मुकावे लागले होते. मात्र, आता तीन महिन्यांनंतर त्याने पुन्हा फलंदाजीच्या सरावाला सुरुवात केली आहे. तो सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत असून, काही दिवसांत सुरू होणार्‍या मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळण्याचे त्याचे लक्ष्य आहे.

मागील दोन महिने मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येच आहे. केवळ एकदाच मी घरी गेलो होतो. मी पुन्हा फिट होण्याचा प्रयत्न करत आहे. मी १० दिवसांपूर्वीच पुन्हा फलंदाजीचा सराव करण्यास सुरुवात केली आहे. येथील फिजियो माझ्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मला मी पूर्णपणे फिट झालो आहे, असे सांगितले. त्यामुळे आता आत्मविश्वास आणि फॉर्म परत मिळवण्यासाठी मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळण्याचे माझे लक्ष्य आहे, असे पृथ्वी म्हणाला.

तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळता आले नाही याचे त्याला दुःख आहे. याविषयी पृथ्वी म्हणाला, ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यांच्यासमोर धावा करणे हे कठीण आव्हान आहे, पण या आव्हानाचा सामना करायला मला आवडले असते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मला खेळता आले नाही याचे दुःख आहे, पण काही गोष्टी तुमच्या हातात नसतात.

पृथ्वीने मागील वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पहिल्याच सामन्यात १३४ धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो भारतासाठी पदार्पणात शतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here