घरक्रीडावानखेडेवर राजस्थान रॉयल्सला मिळाला बूस्टर! MIला हरवून आव्हान राखलं!

वानखेडेवर राजस्थान रॉयल्सला मिळाला बूस्टर! MIला हरवून आव्हान राखलं!

Subscribe

यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच आपलं आव्हान कायम राखण्यासाठी झगडा करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला अखेर स्पर्धेमध्ये बूस्टर मिळाला आहे. स्पर्धेच्या तब्बल २७व्या मॅचमध्ये राजस्थानला त्यांचा दुसरा विजय मिळाला असून मुंबई इंडियन्सला ४ विकेट्सने त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवत राजस्थाननं स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. मात्र, असं असलं तरी आजच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या पॉइंट टेबलमधली स्थानावर फारसा परिणाम झालेला नाही. MI तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

RR अर्थात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, तेव्हा खरंतर मुंबईच्या गोटात शंकेचं वातावरण होतं. पण कॅप्टन रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक या सलामीच्या जोडीनं मुंबई इंडियन्सला तब्बल ९६ धावांची ओपनिंग ११व्याच ओव्हरमध्ये करून दिली. त्यामुळे मुंबई सहज २०० धावांचा टप्पा पार करेल, असंच चाहत्यांना वाटत होतं. पण जॉफ्रा आर्चर आणि एस गोपाल यांनी केलेल्या टिच्चून बॉलिंगमुळे मुंबईला मिळालेल्या तुफान सुरुवातीचा त्यांना फायदा घेता आला नाही. ११व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा ४७ रनांवर आऊट झाल्यानंतर फक्त १८ धावांची भर घालून सूर्यकुमार यादवही माघारी परतला. पोलार्डसुद्धा हाणामारी न करताच माघारी परतला. उलट ६ रन करण्यासाठी त्यानं १२ बॉल खेळून काढले. मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार देणारा सलामीवीर क्विंटन डिकॉक ८१ रनांवर आऊट झाला, तेव्हा मुंबईचे १६३ रन झाले होते आणि फक्त ९ बॉल शिल्लक होते. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्यानं नेहमीच्या शैलीमध्ये फटकेबाजी करत ११ बॉलमध्ये २८ धावा तडकावल्या आणि मुंबईचा स्कोअर १८७पर्यंत पोहोचवला.

- Advertisement -

१८८ रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने सुरुवातीपासूनच पाचव्या गिअरमध्ये सुरुवात केली. १०च्या रनरेटने राजस्थानने सहाव्या ओव्हरनंतर ६० रनांपर्यंत मजल मारली, तेव्हाच मॅचचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होत गेलं. कॅप्टर अजिंक्य रहाणे २१ बॉलमध्ये ३७ रनांवर आऊट झाला, तेव्हा बटलर दुसऱ्या बाजूने हाणामारी करतच होता. चौदाव्या ओव्हरमध्ये वैयक्तिक ८९च्या स्कोअरवर असताना चहरच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादवनं त्याचा कॅच घेतला तेव्हा राजस्थाननं २ विकेटच्या बदल्यात १४७ रनांपर्यंत मजल मारली होती.१७व्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी १८ रनांची आवश्यकता असतान सॅमसनला बुमराहनं एलबीडब्ल्यू करून माघारी पाठवलं.

शेवटच्या तीन ओव्हरमध्ये मॅचमधला खरा थरार सुरू झाला. जेव्हा राजस्थान रॉयल्स आवश्यक असलेल्या १८ रनांचं आव्हान सहज पार करेल असं वाटत असतानाच संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, लियाम लिव्हिंगस्टन आणि स्टीव्ह स्मिथ ही राजस्थानची मधली फळी अवघ्या चार रनांची भर घालून तंबूत परतली. त्यामुळे विजयाच्या जवळ येऊनही पराभव होतोय की काय असं राजस्थानच्या चाहत्यांना वाटू लागलं. पण श्रेयस गोपाल राजस्थानसाठी तारणहार म्हणून उभा राहिला आणि ३ बॉल शिल्लक ठेऊन राजस्थाननं १८८ रनांचं आव्हान पूर्ण केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -