महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस अंतिम फेरीत

शिवनेरी कबड्डी स्पर्धा

Mumbai

महिंद्रा अँड महिंद्र आणि महाराष्ट्र पोलीस या संघांनी शिवनेरी मंडळ कबड्डी स्पर्धेतील विशेष व्यावसायिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला गटात शिवशक्ती महिला संघ आणि अमर हिंद मंडळ यांना अंतिम फेरी गाठण्यात यश आले. महाविद्यालीयन गटात वंदे मातरम डोंबिवली आणि ठाकूर कॉलेज यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले.

विशेष व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीत महिंद्रा अँड महिंद्राने भारत पेट्रोलियमचा ३४-३० असा पराभव केला. हा सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी चांगला खेळ केल्याने नियमित सामना २६-२६ असा बरोबरीत होता. त्यानंतर झालेल्या ५-५ चढायांमध्ये महिंद्रा अँड महिंद्राने ८-४ अशी बाजी मारली. दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस संघाने एअर इंडियावर ३३-१८ अशी मात केली. महाराष्ट्र पोलीस संघाकडून चढाईत महेंद्र राजपूत, सुलतान डांगे आणि बिपिन थले यांनी, तर पकडीत रोहित बनेने उत्कृष्ट खेळ केला.

अमर हिंद मंडळाने महिला गटात डॉ. शिरोडकर क्लबवर ३२-२९ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. या सामन्याच्या मध्यंतराला अमर हिंद मंडळाकडे २०-१४ अशी आघाडी होती. तसेच दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवशक्ती महिला संघाने विश्वशांती मंडळाचा ५१-०४ असा धुव्वा उडवला.

व्यावसायिक अ श्रेणी गटात टी.बी.एम स्पोर्ट्सने शिवाझ एंटरप्राइजवर ४८-२२ असा विजय मिळवला. इनकम टॅक्स संघाने भारत पेट्रोलियमवर (शिवडी) २७-२२ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.