सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली

Delhi
Sreesanth

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) २०१३ साली स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. मात्र, शुक्रवारी श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्याच्यावरील आजीवन बंदी उठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
स्पॉट फिक्सिंगचा आरोप लागल्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने श्रीसंतवर बंदीची कारवाई केली होती. या कारवाईला श्रीसंतने आधी केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी उठली असली तरी तो लगेच क्रिकेटच्या मैदानावर येण्याची शक्यता कमी आहे. कारण, श्रीसंतवरील बंदीचा नवा कालावधी किती असावा हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाने बीसीसीआयलाच दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत श्रीसंत म्हणाला, सर्वोच्च न्यायालयाने मला माझी प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची संधी दिली आहे. लिअ‍ॅडर पेस ४२ व्या वर्षी खेळून ग्रॅण्डस्लॅम जिंकू शकतो, तर ३६ व्या वर्षी मीदेखील क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. मी पुन्हा क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली आहे आणि लवकरच सामने खेळायला लागीन अशी मला आशा आहे. मी बीसीसीआयला विनंती करतो की त्यांनी माझ्या शिक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी पूर्ण ९० दिवस घेऊ नयेत. मी आधीच खुप वाट पाहिली आहे, सहा वर्षे. मला क्लब क्रिकेटपासून सुरुवात करायची आहे आणि एप्रिलमध्ये सुरू होणार्‍या स्कॉटिश लीगमध्ये मला खेळता येईल, अशी आशा आहे.

श्रीसंतबाबत प्रशासकीय समितीच्या बैठकीत चर्चा होणार – विनोद राय

मी सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतबाबत जो निर्णय घेतला त्याबाबत ऐकले आहे. आम्हाला त्या निर्णयाची प्रत मिळवावी लागेल. आम्ही प्रशासकीय समितीच्या बैठकीत नक्कीच या विषयावर चर्चा करू, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची १८ मार्चला बैठक होणार आहे.

बीसीसीआय वैयक्तिक राग ठेवत नाही – चेतन चौहान

बीसीसीआय कोणाही विरोधात वैयक्तिक राग ठेवत नाही. श्रीसंतला जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे असेल तर त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले पाहिजे. थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे सोपे नसते. तो आधी किती फिट आहे हे पहायला हवे. तो इतका वेळ क्रिकेटपासून दूर असल्याने त्याने सुरुवातीला स्थानिक क्रिकेट खेळले पाहिजे, असे भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान श्रीसंतच्या भारतीय संघातील पुनरागमनाबद्दल म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here