वर्ल्डकपमधील पराभव पुढील पिढीला प्रेरणा देईल!

Mumbai
न्यूझीलंडच्या फर्ग्युसनला आशा

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्सवर काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा इंग्लंडने पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. हा अंतिम सामना फारच चुरशीचा झाला.

नियमित सामन्यात दोन्ही संघांनी २४१ धावा केल्या. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी समान धावा केल्या होत्या. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकार लागवणार्‍या संघाला अंतिम सामन्याचा विजेता घोषित करण्यात आले. इंग्लंडने २६-१७ अशी बाजी मारत विश्वचषक जिंकला. या सामन्यात पराभव झाला असला, तरी न्यूझीलंड संघाने ज्याप्रकारे झुंज दिली, त्याने पुढील पिढीला प्रेरणा मिळाली असेल, अशी आशा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला आहे.

तो विश्वचषकाचा अंतिम सामना होता. त्यामुळे या सामन्यात आम्हाला झुंजार खेळ करायचा होता. तसेच खेळाडू म्हणून तुम्हाला या सामन्यात सर्वोत्तम खेळ करून तुमच्या संघाला विजय मिळवून द्यायचा असतो. आता मागे वळून पाहिले, तर तो पराभव पचवणे अवघड जाते आणि आम्ही सहजासहजी तो पराभव विसरू शकणार नाही.

मात्र, आम्ही त्या सामन्यात ज्याप्रकारे खेळलो त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही तो सामना गमावला असला, तरी त्या सामन्यात जसे खेळलो, त्याने न्यूझीलंडच्या पुढील पिढीला प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे. आम्हाला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी मिळेल अशीही आशा आहे, असे फर्ग्युसनने सांगितले.