‘या’ हत्तीणीच्या हेअरस्टाईलवर नेटकरी झाले फिदा

सध्या सोशल मीडियावर या हत्तीणीचा फोटो व्हायरल होत आहे.

Chennai
sengamalam is famous her bob cut hair photo goes viral on social media
'या' हत्तीणीच्या हेअरस्टाईलवर नेटकरी झाले फिदा

तामिळनाडूतील एका हत्तीणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये हत्तीणीची हेअरस्टाईल पाहण्यासारखी आहे. या हत्तीणीचे नाव सेंगामल्ला असे आहे. तामिळनाडूतील थिरुवारुर जिल्ह्यातील मन्नारगुडी येथील राजगोपालस्वामी मंदिरात ही हत्तीण राहत आहे. पण सध्या या हत्तीणीची हेअरस्टाईल चांगलीच चर्चेत आली आहे. या हत्तीणीचा फोटो इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुधा रामेन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

या हत्तीणीचा फोटो शेअर करताना सुधा रामेन यांनी लिहिले आहे की, ‘ही हत्तीण ‘बॉब-कटींग सेंगामल्ला’ नावाने प्रसिद्ध आहे. तिच्या हेअरस्टाईलचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. या हत्तीणीला पाहण्यासाठी तामिळनाडूमधील थिरुवारुर जिल्ह्यातील मन्नारगुडी येथील राजगोपालस्वामी मंदिरात जावे लागेल.’

काही दिवसांपूर्वी सुधा रामेन यांनी या हत्तीणीचा फोटो शेअर केला आहे. पण त्यांनी या हत्तीणीचा फोटो शेअर केल्यापासून सोशल मीडियावर बॉब-कटींग सेंगामल्ला व्हायरल झाली आहे. मन्नई ऑनलाईन वेबसाईटच्या माहितीनुसार, या हत्तीणीला २००३ मध्ये केरळमधील राजगोपालस्वामी मंदिरात आणले गेले होते. त्यानंतर महावत एस राजगोपाल यांनी या हत्तीणीची जबरदस्त हेअरस्टाईल केली आणि त्यानंतर ती प्रसिद्ध झाली. या हत्तीणीची खास देखभाल आणि काळजी घ्यावी लागते.

आतापर्यंत या हत्तीणीच्या फोटोला ३१ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून ५ हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे. २०१८मध्ये टाईम्स ऑफ इंडियाला महावत राजगोपाल यांनी असे सांगितले होते की, ‘मी या हत्तीणीला माझ्या मुलांप्रमाणे वागणूक देतो. त्यामुळे मी हिचा खास लूक केला. एकदा मी इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला होता त्यामधील बाळाचा बॉब-कट मला खूप आवडला होता. त्यानंतर सेंगामल्लाचे मी केस वाढवण्यास सुरुवात केली. आता जेव्हा ती शांत बसते तेव्हा तिचे केस कापणे शक्य होते.’


हेही वाचा – आली लहर केला कहर; पाहा काय झाली प्री वेडिंग शूटची दशा!