काश्मीर मुद्द्यावर शाहीद वि. गंभीर ऑनलाईन सामना!

गौतम गंभीर आणि शाहीद आफ्रिदी या दोघांमध्ये काश्मीर प्रश्नावरून सध्या ट्वीटरवर ऑनलाईन सामना रंगू लागला आहे.

Mumbai
gautam gambhir
गौतम गंभीरचे विधान

कलम ३७० हटवल्यापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधल्या सरकारांसोबतच तिथल्या जनतेच्याही चर्चेमध्ये काश्मीरचा मुद्दा नेहमीच येत आहे. आता या दोन्ही देशांमधल्या सेलिब्रिटींमध्येही या मुद्द्याची चर्चा होऊ लागली आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा आमने-सामने येऊन एकमेकांना भिडलेल्या भारत आणि पाकिस्तानचे दोन क्रिकेटपटू आता काश्मीरच्या मुद्द्यावर ऑनलाईन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काश्मीर मुद्द्यावर शाहीद आफ्रिदीने २८ ऑगस्टला ट्वीट केल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने या मुद्द्यावर शाहीद आफ्रिदीला ट्वीटरवरूनच प्रत्युत्तर दिलं आहे.

शाहीदचं ट्वीट…

कलम ३७०वर ट्वीट करताना शाहीद म्हणतो, ‘काश्मिरी जनतेसाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी सुरू केलेल्या ‘कश्मीर अवर’ या कार्यक्रमाला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यायला हवा. मी स्वत: शुक्रवारी मजार-ए-कैद येथे दुपारी १२ वाजता उपस्थित राहून पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा देणार आहे. आपल्या काश्मीरी बांधवांना समर्थन देण्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या. ६ सप्टेंबरला मी आपल्या शहीद जवानांच्या कुटुंबांना भेट देणार आहे आणि लवकरच मी एलओसी (नियंत्रण रेषा) येथे भेट देणार आहे.’

गौतम गंभीरचं प्रत्युत्तर…

आता मैदानावर देखील शाहीद आफ्रिदीला टशन देणारा गौतम गंभीर या ट्वीटनंतर देखील कसा शांत राहणार? बरं आता तर गंभीर भाजपचा खासदार देखील झाला आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्याचं उत्तर आलं देखील! गंभीरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, ‘मित्रांनो, या ट्वीटमध्ये शाहीद आफ्रिदी शाहीद आफ्रिदीलाच विचारतोय की शाहीद आफ्रिदीने स्वत:ला अजूनच खजील करण्यासाठी अजून काय करावं लागेल. त्यामुळे आता हे सिद्ध झालं आहे की शाहीद अफ्रिदी कधीही मोठा होऊ शकणार नाही. त्यामुळे मी शाहीद आफ्रिदीला मदत करण्यासाछी ऑनलाईन किंडरगार्टन ट्युटोरिअल ऑर्डर करतोय!’

शाहीदही थांबेना…

दरम्यान, गौतम गंभीरने केलेल्या ट्वीटवर शाहीद पुन्हा सुरू झाला. त्यानं भारतीय क्रिकेट टीमच्या मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अपटन यांचं वक्तव्य ट्वीट केलं आहे. शाहीद म्हणतो, ‘कराचीमधलं वातावरण बदललं आहे. जेव्हा जेव्हा गौतम गंभीर स्वत:चं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला पॅडी अपटन यांचं वाक्य आठवतं’. असं म्हणत शाहीदनं एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटमध्ये पॅडी अपटन म्हणतात, ‘गौतम गंभीर हा मी काम केलेला सर्वाच कमजोर आणि मानसिकरित्या सर्वात असुरक्षित खेळाडू आहे’.

या दोघांच्याही या ऑनलाईन सामन्याचा ऑनलाईन प्रेक्षक आणि त्यांचे चाहते देखील ऑनलाईनच आस्वाद घेत आहेत!