घरक्रीडावॉर्नरचा झंझावात कायम

वॉर्नरचा झंझावात कायम

Subscribe

स्पर्धेतील दुसर्‍या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने उभारल्या ३८१ धावा

सलामीवीर डेविड वॉर्नरने विश्वचषकातील दमदार कामगिरी सुरु ठेवत शतक झळकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत ५ बाद ३८१ अशी धावसंख्या उभारली. ही ऑस्ट्रेलियाची विश्वचषकातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच वॉर्नरचे ६ सामन्यांतील हे दुसरे शतक होते. त्याने दोन अर्धशतकेही केली आहेत. बांगलादेशकडून कामचलाऊ मध्यमगती गोलंदाज सौम्या सरकारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

ट्रेंट ब्रिजच्या फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फिंच आणि वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. याआधी ५ पैकी ४ सामन्यांत किमान अर्धशतकी भागीदारी करणार्‍या या जोडीने बांगलादेशविरुद्ध १२१ धावांची भागी केली. वॉर्नरने ५५ चेंडूत, तर फिंचने ४७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यावर फिंच फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला ५३ धावांवर सौम्या सरकारने रुबेल हुसेनकरवी झेलबाद केले. वॉर्नरने मात्र दुसर्‍या बाजूने गोलंदाजांची धुलाई सुरु ठेवत ११० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील १६ वे आणि या विश्वचषकातील दुसरे शतक होते.

- Advertisement -

यानंतर त्याने धावांची गती वाढवली. त्याला उस्मान ख्वाजाने चांगली साथ दिली. ख्वाजाने संयमाने खेळत ५० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरने मुस्तफिझूरवर हल्ला चढवत एकाच षटकात चार चौकार लगावले. पुढील षटकात षटकार मारत त्याने १३९ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या. पुढे अधिक आक्रमक खेळण्याच्या नादात तो १६६ धावांवर बाद झाला. त्याने या धावा १४७ चेंडूत १४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने केल्या.

त्याने आणि ख्वाजाने दुसर्‍या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या १० चेंडूत ३२ धावा केल्यावर रुबेलने त्याला धावचीत केले. याच षटकात ख्वाजाही बाद झाला. त्याने ७२ चेंडूत १० चौकारांसह ८९ धावांची खेळी केली. यानंतर स्टोइनिस आणि अ‍ॅलेक्स कॅरीने फटकेबाजी केल्याने ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ३८१ धावांपर्यंत मजल मारली.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक-

ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ५ बाद ३८१ (डेविड वॉर्नर १६६, उस्मान ख्वाजा ८९, अ‍ॅरॉन फिंच ५३; सौम्या सरकार ३/५८, मुस्तफिझूर रहमान १/६९) वि. बांगलादेश.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -