घरक्रीडाविजयी सुरुवातीसाठी सज्ज!

विजयी सुरुवातीसाठी सज्ज!

Subscribe

भारत-द.आफ्रिका पहिला टी-२० सामना आज

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्‍याची आणि भारतातील नव्या मोसमाची रविवारपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी धर्मशाळा येथे रंगणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक होणार असल्याने प्रत्येक टी-२० सामन्याला आता विशेष महत्त्व आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी या मालिकेत काही युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संघात विविध प्रयोग करतानाच दोन्ही संघांचे हा सामना जिंकत या मालिकेची विजयी सुरुवात करण्याचे लक्ष्य असेल.

भारताने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौर्‍यात अप्रतिम प्रदर्शन केले. वेस्ट इंडिजचा संघ टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जातो. मात्र, भारताने त्यांना या मालिकेत ३-० अशी धूळ चारली. परंतु, भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असला तरीही दक्षिण आफ्रिकेवर मात करणे त्यांना सोपे जाणार नाही. दक्षिण आफ्रिकेकडे कर्णधार क्विंटन डी कॉक, वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, डेविड मिलर यांसारखे ’मॅचविनर’ खेळाडू आहे. मात्र, त्यांना अनुभवी फॅफ डू प्लेसिस, हाशिम आमला, इम्रान ताहिर या अनुभवी खेळाडूंची उणीव भासेल.

- Advertisement -

पुढील वर्षी होणार्‍या विश्वचषकाआधी भारतीय संघ जवळपास वीस टी-२० सामने खेळणार आहे. या सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना जास्तीतजास्त संधी देण्याचा संघ व्यवस्थापन प्रयत्न करणार आहे, असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांचे टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील स्थान निश्चित आहे. परंतु, या पाच जणांव्यतिरिक्त इतर खेळाडूंना संधी मिळवण्यासाठी आगामी काळात सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.

भारताच्या टी-२० संघात चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांच्यापैकी कोणाला खेळवायचे, हा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे आहे. तसेच महेंद्रसिंग धोनीने अजून निवृत्तीची घोषणा केली नसल्याने युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला संघातील स्थान टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या अनुपस्थितीत राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या आणि अनुभवी रविंद्र जडेजा हे फिरकीची धुरा सांभाळतील. तसेच वेगवान गोलंदाजांमध्ये दीपक चहर, नवदीप सैनी, खलील अहमद यांना स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आता हे युवा खेळाडू या मालिकेत कशी कामगिरी करतात याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (कर्णधार), रॅसी वॅन डर डूसेन (उपकर्णधार), टेंबा बवुमा, ज्युनियर डाला, बोर्न फॉर्चून, ब्यूरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेविड मिलर, एन्रिच नॉर्टजे, अ‍ॅन्डिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, जॉर्ज लिंडे.

सामन्याची वेळी – संध्याकाळी ७ पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -