घरमुंबईजन्मदिन साजरा करत सिग्नल शाळेत बालदिनाचा जल्लोष

जन्मदिन साजरा करत सिग्नल शाळेत बालदिनाचा जल्लोष

Subscribe

सिग्नल शाळेच्या माध्यमातून 4 वर्षांपूर्वी शिक्षणाच्या परिघात आलेल्या 42 मुलांचा बालदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पुलाखाली जन्मलेल्या या मुलांच्या नेमक्या जन्मतारखांचा शोध लागला नसल्याने बालदिनच त्यांचा जन्मोत्सव व्हावा या कल्पनेने गुरुवारी सिग्नल शाळेत केक कापून सर्व मुलांचा जन्मदिन साजरा करण्यात आला.

तीन हाथ नाका सिग्नल पुलाखाली 4 वर्षापूर्वी सिग्नल शाळेची मूहूर्तमेढ रोवली गेली. या निमित्ताने सिग्नलवरील भिक्षेकरी असलेल्या किंवा वस्तू विकणार्‍या 42 मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठाने सिग्नल शाळेच्या माध्यमातून उभे केले. या 4 वर्षात शाळेतील 2 विद्यार्थी 65 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत दहावी उत्तीर्ण झाले. तसेच इतर दोन विद्यार्थी सिग्नल शाळेचा उंबरठा ओलांडून सरस्वती सेकडंरी शाळेत मार्गस्थ झाले. केंद्रशासनाने ‘सिग्नल शाळा’ उपक्रमाला देशातील अंत्योदयासाठीचा सर्वोकृष्ट प्रकल्प म्हणून गौरविले आहे. सिग्नल शाळेच्या 4 वर्षाच्या प्रवासात मुलांच्या व्यक्तीमत्त्वात अनेक आयाम जोडली गेली. विविध कार्यक्रम उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.

- Advertisement -

पुलाखाली जन्मलेल्या या मुलांच्या जन्मतारखेचा नेमका उलगडा होत नाही. इतर मुलांप्रमाणे आपला जन्मदिवस कधी साजरा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. या पार्श्वभूमीवर बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या सर्व मुलांचा जन्मोत्सव गुरुवारी सिग्नल शाळेत साजरा करण्यात आला. केक कापण्यासोबतच भेटवस्तू देऊन वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. पहिल्यांदाच वाढदिवस साजरा केलेल्या मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद अवर्णनीय होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -