घरमुंबईआरे वृक्षतोड प्रकरण : एक झाड तोडण्यासाठी १३ हजार रुपये?

आरे वृक्षतोड प्रकरण : एक झाड तोडण्यासाठी १३ हजार रुपये?

Subscribe

आरेतील वृक्षतोडीत प्रत्येक झाड तोडण्यासाठी जवळपास १३ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची प्रतिक्रिया आनंद भंडारे यांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वी आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. ४ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत दोन हजार ११ झाडे तोडण्यात आली असून यासाठी प्रत्येक झाड तोडण्यासाठी तब्बल १३ हजार ४३४ रुपये एवढा खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारातील माहितीमुळे पुढे आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी यासंदर्भातील माहितीची एमएमआरसीएलकडे माहिती अधिकारात विचारणा केली. यावेळी आरेतील वृक्षतोडीत प्रत्येक झाड तोडण्यासाठी जवळपास १३ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एमएमआरसीएलच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

आरे वृक्षतोड प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी भंडारे यांनी एमएमआरसीला १५ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. पण ९ डिसेंबर रोजी भंडारे यांना माहिती प्राप्त झाली. तेव्हा माहितीच्या अधिकारात एका महिन्याच्या कालावधीत उत्तराची अपेक्षा असताना दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे एमएमआरसीएलच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे भंडारे यांनी सांगितले.

- Advertisement -

उत्तर देण्यास विलंब का झाला?

विशेष म्हणजे भंडारे यांना पोस्टाद्वारे माहिती न देता हाती ही माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत माहिती न मिळाल्याने भंडारे यांनी अपील केले. त्यानंतर ही प्रक्रिया पुढे नेली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. भंडारे यांना मिळालेल्या पत्रावर ११ नोव्हेंबरची तारीख दिसते. तेव्हा जर पत्र डिसेंबर महिन्यात प्राप्त झाले तर मग त्यावर नोव्हेंबरची तारीख कशी काय? आणि जर पत्रावर ११ नोव्हेंबरची तारीख असेल तर उत्तर देण्यास उशीर का झाला? ही बाब स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे मत भंडारे यांनी व्यक्त केले.

एक झाड जगवण्यासाठी होतो एवढा खर्च

यावर पर्यावरणप्रेमींनीसुद्धा आपले म्हणणे मांडले आहे. पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांच्या म्हणण्यानुसार नवीन लावलेले एक झाड जगवण्यासाठी तीन वर्षांसाठी एक हजार रुपये खर्च करण्यात येतात. त्यामुळे एवढे पैसे खर्च करुन वृक्षतोड करण्याचा एमएमआरसीएलचा अट्टाहास कशासाठी असा मुद्दा येथे उपस्थित होतो. त्याऐवजी कारशेडसाठी मोकळी जागा शोधली असता वनसंपत्ती आणि आर्थिक संपत्ती दोन्हींचे संरक्षण झाले असते अशी भावना व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -