घरक्रीडाजय भारत, न्यू परशुराम मंडळ उपांत्य फेरीत

जय भारत, न्यू परशुराम मंडळ उपांत्य फेरीत

Subscribe

मुंबई शहर जिल्हा निवड चाचणी कबड्डी

जय भारत क्रीडा मंडळ, न्यू परशुराम क्रीडा मंडळ या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील मुलांच्या ज्युनियर गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या फेरीत जय भारतचा सामना न्यू परशुराम क्रीडा मंडळाशी, तर विजय नवनाथचा सामना श्री राम क्रीडा विश्वस्तशी होईल. नायगावच्या शारीरिक शिक्षण मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या ज्युनियर गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत जय भारत क्रीडा मंडळाने साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लबचा २९-२० असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतराला जय भारतकडे १०-५ अशी भक्कम आघाडी होती. त्यांच्याकडून रोहन पाटील, शुभम मटकर यांनी अप्रतिम खेळ केला.

न्यू परशुराम क्रीडा मंडळाने मध्यंतरातील २०-२३ अशी पिछाडी भरून काढत नवोदित संघावर ४३-३६ अशी मात केली. अमेय शिंदे, वेदांत ठोंबरे यांच्या दमदार खेळामुळे नवोदित संघाला मध्यंतराला ३ गुणांची आघाडी होती. मात्र, शुभम धनावडे, गौरव नेने यांच्या खेळामुळे न्यू परशुरामने उत्तरार्धात दमदार पुनरागमन करत हा सामना ४३-३६ असा ७ गुणांच्या फरकाने जिंकला. विजय नवनाथ क्रीडा मंडळाने अंकुर स्पोर्ट्सला ४९-१५ असे सहज पराभूत केले. हर्ष लाड, दीपक बोर्डेकर, प्रथमेश दहीबावकर यांना या विजयाचे श्रेय जाते.

- Advertisement -

श्री राम क्रीडा विश्वस्त मंडळाने अशोक मंडळाला २०-१६ असे नमवत स्पर्धेत आगेकूच केली. या सामन्याच्या सुरुवातीला राम क्रीडा विश्वस्तच्या संघाला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला ते ६-८ असे पिछाडीवर होते. परंतु, उत्तार्धात त्यांनी आपल्या खेळात सुधारणा करत हा सामना जिंकला. त्यांच्या विजयात गणेश महाजन, तुषार शिंदे हे खेळाडू चमकले.

सब-ज्युनियर गटाच्या दुसर्‍या फेरीत लोअर परळच्या वंदे मातरमने श्री साई क्रीडा मंडळाचा ६३-५० असा पराभव केला. वेदांत जाधव, शुभम कंक वंदे मातरमकडून, तर पियुष पाटील, चिराग सालीयन श्री साई संघाकडून उत्कृष्ट खेळले. नायगावच्या वंदे मातरम मंडळाने रंगतदार सामन्यात श्री गणेश व्यायामशाळेला ६५-६३ असे पराभूत केले. त्यांच्याकडून अथर्व सारंग, वेदांत मोहिते उत्तम खेळले. अभिनव चाळ कमिटीने प्रफुल्ल सोनावणे, आर्यन गोरीवलेच्या खेळामुळे गोल्फादेवी सेवा मंडळाला ५७-४५ असे नमवले. हिंदमाता सेवा मंडळाने दिलखूष क्रीडा मंडळावर ४१-२३ अशी मात केली. ओम घोंगडे, अभिजित अरेकर या विजयाचे शिल्पकार ठरले. श्रीराम क्रीडा विश्वस्तने दुर्गामाता स्पोर्ट्सचा ६०-३० असा धुव्वा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -