घरमुंबईदत्ता भरणेंचं आपल्याच खात्याच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात बस्तान!

दत्ता भरणेंचं आपल्याच खात्याच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात बस्तान!

Subscribe

वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या दालनावर कब्जा केला आहे. राज्यमंत्र्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे मंत्रालयातील शाखा अभियंत्यांचे कार्यालय अडगळीच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना विधानभवनात कार्यालय देण्यात आले होते. विधानभवनातील दालन सर्वार्थाने गैरसोयीचे असल्याने बहुतांश राज्यमंत्र्यांनी मंत्रालयातील मोक्याचा दालनांचा शोध सुरू केला होता. मंत्रालयात मंत्र्यांसाठी दालन शिल्लक नसल्याने अखेर भरणे यांनी आपल्याच खात्यातील शाखा अभियंत्यांचे दालन पटकावले आहे!

कार्यालयात बस्तान, कामाला सुरुवात!

मंत्रालय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांचे सुसज्ज कार्यालय होते. मंत्रालय इमारत आणि परिसरातील देखभाल दुरूस्तीचे काम या कार्यालयातून सुरू होते. तळमजल्यावर असलेल्या या कार्यालयावर अनेक राज्यमंत्र्यांची नजर होती. शेवटी भरणे यांनी आपल्याच विभागाचे कार्यालय असल्याने त्याचा ताबा घेतला आणि कामकाजाला सुरूवात केली.

- Advertisement -

अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उंदरांचा उच्छाद!

आता शाखा अभियंत्यांचे कार्यालय मंत्रालय विस्तारीत इमारतीच्या तळमजल्यावर हलविण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कार्यालयाची जागा अपुरी असून कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी सोय नाही. तसेच इथे उंदरांनी उच्छाद मांडल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांसाठी मंत्रालयात असलेले ६०२ क्रमांकाचे दालन नाकारून सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिवांचे दालन ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांसाठी नेमून दिलेल्या दालनावर मंत्र्यांचे अतिक्रमण होत असल्याने अधिकारी वर्गात नाराजी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -