घरमुंबईनाका कामगाराला बनवले कंपनीचा संचालक

नाका कामगाराला बनवले कंपनीचा संचालक

Subscribe

आयकर खात्याकडून १ कोटी ८५ लाख कर भरण्याची नोटीस

टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोहने गाळेगाव येथे नाका कामगार म्हणून काम करीत असणार्‍या मजुराच्या नावाने महेंद्र कोटक बँक मुंबई सेंट्रल शाखेत बनावट अकाउंट उघडून २५० कोटींचे कर्ज घेत त्याला एका इंटरनॅशनल कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक बनवले. त्यामुळे त्याला चक्क कल्याण आयकर विभागाने १ कोटी ८५ लाख रुपये कर भरण्याची नोटीस बजावली आहे. झोपडीत राहणार्‍या या मजुराने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

मोहोने, गाळेगाव येथील धम्मदीप नगर झोपडपट्टीमध्ये भाऊसाहेब अहिरे हा नाका कामगार आपल्या कुटुंबासह राहतो. २०१६ साली नोटबंदीच्या सुमारास कोणातरी अज्ञात इसमाने त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करून मुंबई सेंट्रलमधील महेंद्र कोटक बँकेतून बोगस अकाउंट उघडले. तसेच गुगलद्वारे बोगस आंतरराष्ट्रीय मार्केटिंग कंपनी खोलून त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या मजुराची कागदोपत्री केली.

- Advertisement -

मात्र बँकेच्या अकाउंटला भाऊसाहेब अहिरे यांचा फोटो नसून अज्ञात इसमाचा फोटो आढळून आला आहे. या संदर्भात भाऊसाहेब यांना विचारणा केली असता, बँकेत सही देखील माझी नसल्याचे त्यांनी सांगितले. गुगल द्वारे मार्केटिंग कंपनी स्थापन केलेल्या या टोळीने पद्धतशीरपणे २०१६ नंतर महिंद्र कोटक बँकेकडून २५० कोटींचे कर्ज घेत एका खात्याच्या क्रमांकातून कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे.

या बँक खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने कल्याण आयकर विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये अहिरे यांना नोटीस बजावली. मात्र आपले असे बँक खाते अस्तित्वात नसल्याने त्यांनी या नोटीसकडे दुर्लक्ष केले होते. पण सततच्या कोट्यवधींच्या उलाढालीमुळे आयकर विभागाने डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा नोटीस बजावून १ करोड ८५ लाख रुपये कर भरण्याचे निर्देश भाऊसाहेब अहिरे यांना दिले. यामुळे भाऊसाहेब अहिरे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या संदर्भात त्यांनी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांना प्रत्यक्षात भेटून आपली कैफियत मांडली. तसेच संबंधित बँकेवर व बनावट खाते उघडणार्‍या टोळीवर दंडात्मक कारवाई करून न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -