घरमहाराष्ट्रनाशिकनिमोण गाव आता चौदा दिवसांसाठी प्रतिबंधीत

निमोण गाव आता चौदा दिवसांसाठी प्रतिबंधीत

Subscribe

कोरोनामुळे संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका ५४ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने निमोण गाव आता प्रशासनाने कन्टेन्मेंट झाेन जाहीर केले आहे.

चौदा दिवस आता गावातील अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवसाय आता २ जूनपर्यत बंद राहणार आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून बाधितांच्या संपर्कातील २१ व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाबाधितापैकी एकाचा मृत्यू झाल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निमोणमध्ये ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर तेथीलच आणखी एकाला कोरोना असल्याचा अहवाल आल्याने संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी निमोणमध्ये जात माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील घेतली. यावेळी प्रभारी सरपंच दगडू घुगे, संदीप देशमुख, अनिल घुगे, ग्रामविकास अधिकारी एस. वाय. मिसाळ, बबन सांगळे आदी उपस्थित होते. ज्या भागात करोनाबाधित रुग्ण आढळले तो श्रीकृष्ण मंदिर, राजवाडा, तेली गल्ली, आत्तार गल्ली, स्मशानभूमी परिसर, बस स्टॉप, ग्रामपंचायत गाळे असलेला हा भाग तातडीने सील करण्याचे आदेश त्यांनी दिले. या प्रतिबंधीत भागात नागरिकांना येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

बाधित व्यक्तीपैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या रुग्णावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे बाधितांच्या संपर्कातील २१ व्यक्तींना प्रशासनाने ताब्यात घेत त्यांची रवानगी नगरच्या जिल्हा रुग्णालयात केली. तर निमोण गावच्या ४३२५ लोकसंख्येपैकी बाधित क्षेत्रातील १३७७ लोकसंख्येसाठी आरोग्य विभागाची सहा पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकाद्वारे घरोघर आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी सांगितले. याशिवाय पिंपळे (संगमनेर) येथील एका व्यक्तीला कोरोनासदृष्य लक्षणे आढळल्याने त्यालादेखील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. निमोणमध्ये प्रवेश करणारे गावाअंतर्गत रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. पोलिस पथकदेखील गावात तैनात करण्यात आले. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काेणत्याही नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -