घरमनोरंजनसंजय भन्साळींना चौकशीचे समन्स

संजय भन्साळींना चौकशीचे समन्स

Subscribe

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी बॉलीवूडचे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी संजय भन्साळी हे चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याचे बोलले जाते. त्यांच्या तीन चित्रपटात आधी सुशांत सिंह राजपूतला साईन करण्यात आले होते, मात्र नंतर त्याच्याजागी दुसर्‍या कलाकाराला घेण्यात आले होते. यामागे बॉलीवूडमधील अंतर्गत गटबाजी आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या आत्महत्याप्रकरणी एका बड्या सिनेदिग्दर्शकाला चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याने इतर कलाकरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सध्या वांद्रे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याच गुन्ह्यात आतापर्यंत तीसहून अधिक लोकांची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, मात्र याविषयी अधिकृतपणे काहीही सांगण्यास पोलीस तयार नाहीत, आता संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. संजय लीला भन्साळी हे शुक्रवारी वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या गोलियों की रासलीला-रामलीला या चित्रपटात सुशांतला साईन करण्यात आले होते, मात्र नंतर त्याला काढून रणवीर सिंह याला नायकाची भूमिका देण्यात आली होती. रामलीला चित्रपटात सुशांतला बाजूला करुन रणवीर सिंगला घेण्यामागे काय कारण होते, त्यांच्यात वाद झाला होता का, कुठल्या कारणावरुन वाद झाला होता, सुशांतला चित्रपटातून काढून टाकण्यासाठी संजय लीला भन्साळीवर कोणी दबाव आणला होता का याचा तपास सुरु आहे.

- Advertisement -

रामलीलानंतर सुशांतला बाजीराव मस्तानीसाठी सुरुवातीला सुशांतच्या नावाची चर्चा झाली होती, मात्र यावेळेस त्याचे नाव मागे पडले आणि पुन्हा रणवीर सिंगला घेण्यात आले होते. सुशांत हा यशराज बॅनर्सच्या पानी चित्रपटात काम करीत असल्याने त्याने या चित्रपटाला नकार दिल्याची चर्चा होती, मात्र सुशांतला कटकारस्थान करुन या चित्रपटातून काढण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. संजय लीला भन्साळी हे सुशांतच्या आवडत्या दिग्दर्शकांमध्ये होते, त्यांच्यासोबत त्याला काम करण्याची प्रचंड इच्छा होती, मात्र दोन्ही वेळेस त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. चित्रपट समीक्षक सुभाष झा यांनीही सुशांत हा संजय भन्साळीच्या तीन चित्रपटात काम करणार होता असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. शुक्रवारी ते चौकशीसाठी हजर राहतील असेही बोलले जाते. मात्र या वृत्ताला वांद्रे पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -