‘गाव गाता गजाली’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री शुभांगी भुजबळ. गाव गाता..मध्ये मास्तराच्या बायकोची भूमिका साकारलेल्या शुभांगी नाटक, सिनेमा आणि जाहिरात या तिनही क्षेत्रांत वावरली आहे. झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी या घरची या लोकप्रिय मालिकेतही तिने काम केले होते. इतकंच नाही तर गेल्या ९ वर्षांपासून शुभांगी आकाशवाणीवरही काम करत आहे. सध्या रंगभूमीवर सुरु असलेल्या ‘जुगाड’ या नाटकामध्ये शुभांगी, अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि ह्रषिकेश जोशी यांच्यासोबत काम करत आहे. हॉर्लिक्स आणि आयडिया यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही शुभांगी झळकली आहे. ‘डबिंग’च्या क्षेत्रातही शुभांगीने अनेकदा तिच्या आवाजाची पेरली आहे.
वामन केंद्रें आणि जयदेव हट्टंगडींसारख्या नाट्यक्षेत्रातील दिग्गजांकडून नाटकाचे धडे गिरवलेल्या शुभांगीने अनेक व्यायवसायिक आणि प्रायोगिक नाटकांमधून कामं केली आहेत. त्यापैकी आयदान आणि घोळात घोळ ही तिची नाटकं विशेष गाजली. या दोन नाटकांसाठी शुभांगीला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय ‘सरकार 3’ आणि ‘बाॅम्बे टॉकीज’ या बॉलीवूडपटातही शुभांगीने काम केलं आहे. ‘बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणं आणि त्यातही आपल्या अभिनयासाठी त्यांच्यासारख्या दिग्गजांकडून पावती मिळणं यासाठी खूप मोठं नशीब लागतं’, असं शुभांगीने गप्पांदरम्यान सांगितलं. अभिनय, व्हॉईसओव्हर आणि डबिंगच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणारी शुभांगी भरतनाट्यम या नृत्यप्रकारातही विशारद आहे. याच मुद्द्याला धरुन शुभांगीला डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारले असता ती म्हणाली,‘रिअॅलीटी शोमधला खोटा खोटा अभिनय मला फारसा आवडत नाही. त्यामुळे मी तिथे रमेन असं वाटत नाही.’
मराठी रंगभूमीपासून ते बॉलीवूडपर्यंत अभिनय, जाहिरात आणि आवाजाच्या क्षेत्रात वावरलेल्या शुभांगीने तिच्या आजवरच्या प्रवासातीस अनेक अनुभव माय महानगरशी शेअर केले. पाहुया, नेमकं काय म्हणाली शुभांगी :