घरक्रीडाIPL 2021 : मुंबईचे सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! आज रोहित-वॉर्नर आमनेसामने

IPL 2021 : मुंबईचे सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! आज रोहित-वॉर्नर आमनेसामने

Subscribe

हैदराबादने आपले दोन्ही सामने गमावले असून ते पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या बलाढ्य संघांमध्ये सामना होणार असून मुंबईचे सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल. गतविजेत्या मुंबईला यंदाच्या मोसमाची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईला सलामीच्या लढतीत पराभूत केले होते. त्यानंतर मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दमदार पुनरागमन करत मुंबईने यंदाच्या मोसमातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. दुसरीकडे हैदराबादने आपले दोन्ही सामने गमावले असून ते पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.

दोन्ही संघांनी ८-८ सामने जिंकले

मुंबई हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मात्र, असे असले तरी सनरायजर्स हैदराबादने या संघाला नेहमीच चांगली झुंज दिली आहे. या संघांमध्ये आतापर्यंत १६ सामने झाले असून दोन्ही संघांनी ८-८ सामने जिंकले आहेत. मागील मोसमातही या संघांनी १-१ सामना जिंकला होता. त्यामुळे चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

- Advertisement -

हैदराबाद संघात बदल होणार? 

मुंबईने कोलकाताला १० धावांनी पराभूत करत यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवला होता. या सामन्यात कोलकाताला अखेरच्या पाच षटकांत विजयासाठी केवळ ३१ धावांची आवश्यकता होती. परंतु, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी अप्रतिम गोलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिली. हैदराबादला मात्र कोलकातानेच पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात बंगळुरूने त्यांच्यावर मात केली. या सामन्यात कर्णधार डेविड वॉर्नरने अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबाद संघात काही बदल करण्याची शक्यता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -