हल्लीच्या तरुणाईला शास्त्रीय संगीत आवडत नाही असे म्हटले जाते. परंतु याच तरुणाईला भारतीय शास्त्रीय संगीताकडे आकर्षित करणारा गायक म्हणजे राहूल देशपांडे. टिव्हीरील रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून, शास्त्रीय गायनाच्या मैफिलीतून, संगीत नाटकांमधून राहुल नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता हाच राहुल रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. तोदेखील सहायक कलाकार किंवा कॅमियो करणार नसून प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्याने त्याचे ट्विटर हँडल तसेच फेसबुक पेजवरून त्याच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर अपलोड केले आहे. ‘अमलताश’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. या आगामी चित्रपटातून राहुल लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
Guys, I am soooo excited. Here’s my first film Amaltash. A film that alongwith my heart has my voice and my face as the protagonist of a beautiful story. In the official selection at the Mumbai Film Festival. Do come. pic.twitter.com/g8Q7dbumMk
— Rahul Deshpande (@deshpanderahul) October 17, 2018
राहुल देशपांडे याने अनेक संगीत नाटकांमध्ये काम केले आहे. बालगंधर्व आणि पुष्पक विमान या चित्रपटांमध्ये त्याने लहानशा किंवा कॅमियो स्वरूपातील भूमिका केल्या आहेत. परंतु चित्रपटात मुख्य भूमिकेत राहुल देशपांडे प्रथमच झळकणार आहे. कलाकाराच्या जीवनाभोवती रेंगाळणारा हा सिनेमा असल्याचे मत अनेकांनी पोस्टर पाहुन व्यक्त केले. चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे.
राहुल देशपांडेच्या ‘अमलताश’ या आगामी चित्रपटाची यंदा ‘मामि’ फिल्म फेस्टिवल्ससाठी निवड करण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे. या चित्रपटात राहुलसोबत त्याची बहीण दीप्ती माटेदेखील झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी अमलताशसाठी राहुलने केस कापले होते. शिवाय राहुल पियानो, गिटारसारखी वाद्य शिकल्याचेही सोशल मीडियामध्ये शेअर केले होते. राहुलच्या चाहत्यांना आता त्याचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता लागली आहे.