घरमुंबईविरार में खुशी तो वसई में गम...

विरार में खुशी तो वसई में गम…

Subscribe

रेल्वेच्या नव्या वेळापत्राचा कुठे जल्लोष, तर कुठे व्यक्त झाली नाराजी

पश्चिम रेल्वे प्रशासनाने 1 नोव्हेंबर पासून लोकल गाड्यांचे नवे वेळापत्रक जाहीर करत मुंबईकरांना आनंदाची बातमी दिली. मात्र या बातमीमुळे काही प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला आहे. तर काही प्रवाशांनी केक कापत आपला आनंद साजरा केला. त्यामुळे मुंबईकरांची परिस्थिती कभी खुशी कभी गम अशीच झाली आहे. असे असले तरीही यावर रेल्वेकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. हे वेळापत्रक गुरुवारपासून लागू झाले. सोबतच या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर १० गाड्यांच्या नवीन फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत. या गाड्या ताफ्यात आल्यानंतर आता पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 122 फेर्‍या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पश्चिम रेल्वेने रेल्वे स्थानकावरील गर्दीचे सर्वेक्षण करून लोकलचे नवे वेळापत्रक तयार केले. या वेळापत्रकानुसार काही गाड्याच्या थांब्यांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तर काही गाड्या नव्या रेल्वे स्थानकावरून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2018 या वेळापत्रानुसार सर्व लोकल गाड्या सुरु होत्या. या वेळापत्रकानुसार सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी भाईंदर-चर्चगेट महिला विशेष लोकल आता विरार स्थानकावरुन ८ वाजून ४४ मिनिटांनी सुटणार आहे. त्याचबरोबर वसई रोड येथून ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी गाडी विरार येथून ९ वाजून ४७ मिनिटांनी सुटणार आहे. त्यामुळे या नव्या वेळापत्रकावर प्रवासी संघटना नाराज झाल्या आहेत. याशिवाय महिला प्रवासीही नाराज असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

कामाच्या निवेदनावर लक्ष नाही

रोज सकाळी वसई स्थानकातून निघणारी महिला विशेष ९. ५६ वाजताची ट्रेन ही वसई आणि नायगांव येथील महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळत होता. या लोकल ट्रेन मधून म्हातार्‍या बायका, गरोदर स्त्रीया, विद्यार्थिनी लहान मुलांना घेऊन प्रवास करणार्‍या स्त्रिया सहज प्रवास करू शकत होत्या. तसेच बर्‍याच महिलांनी आपला कार्यलयीन वेळ या वेळेनुसार बदलून घेतली होती. त्याच प्रमाणे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे ही बाब आम्ही निदर्शनात आणून दिली होती. मात्र रेल्वेने महिलांचा विचार न करता ही वसईवरून सुटणारी लेडीज स्पेशल ट्रेन आता विरार वरून सोडण्याचा निर्णय नव्या वेळापत्रकानुसार घेतला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

वसईतील महिलांचा प्रवास त्रासदायक

महिला विशेष लोकल विरार मधून पूर्ण भरून येत असल्यामुळे वसई आणि नायगांव येथील प्रवाशांना अशा लोकल ट्रेनमध्ये चढणे अशक्य होते आणि त्यातून बरेचदा लहान- मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यातच भर म्हणून कोणताही विचार न करता सकाळची वसई महिला विशेष लोकल रद्द करून विरार ट्रेन सुरु केली आहे. त्यामुळे प्रवास सोईस्कर होण्याऐवजी त्रासदायक झाला असल्याचा आरोपसुद्धा महिला प्रवाशांनी केला आहेत.

- Advertisement -

विरार मध्ये जल्लोष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लेडीज स्पेशल ट्रेन सुरु करण्याची मागणी मागील ६ महिन्या पासून केली होती. त्याची दखल घेत पश्चिम रेल्वेने १ नोव्हेंबर पासून विरार ते चर्चगेट लेडीज स्पेशल लोकल चालविण्यात येत आहेत. त्यामुळे विरारच्या महिला प्रवाशांना मोठा फायदा झाला आहेत. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे विरार रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला. सोबतच विरारच्या प्रवाशांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार सुद्धा व्यक्त केले आहेत. मनसेचे विरार शहर संघटक मनोहर कदम यांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले की, विरार कारशेडमधून लोकल सुरु करण्यासाठी आम्ही स्वाक्षरी उपक्रम सुरु केला होता. त्यात ८ हजार प्रवाशांनी स्वाक्षरीसुद्धा केल्या होत्या. सोबतच मागील ६ महिन्यापासून आम्ही या मागणीचा पश्चिम रेल्वेकडे पाठपुरावा केला. त्याला पश्चिम रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला.

जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त

पश्चिम रेल्वेच्या नव्या वेळापत्रकामुळे जोगेश्वरीतील प्रवाशांनीदेखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. जोगेश्वरी फलाट क्रमांक ३ आणि ४ वरून नव्या वेळापत्रकानुसार काही लोकल थांबणार नसल्यामुळे प्रवाशांमध्ये पश्चिम रेल्वेविषयी गुरुवार सकाळपासूनच असंतोष खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. त्यामुळे पश्चिम रेल्वेने याची दखल घेत मोठ्या प्रमाणात सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होती. प्रवाशांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले की, जोगेश्वरी फलाट क्रमांक ४ वर गोरेगावच्या ४ तर मालाडच्या २ अशा ६ लोकल थांबत होत्या. मात्र नव्या वेळापत्रकानुसार यांचा हॉल्ट हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक ६ येथे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जोगेश्वरीच्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागणार आहेत. गुरुवार सकाळपासून जोगेश्वरीच्या रेल्वे प्रवाशांनी स्टेशन मास्टरच्या कार्यलयात जाऊन फलाट क्रमांक ४ वरून लोकल पुन्हा सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

वसई- नायगांव आणि पुढच्या रेल्वे स्थानकावरील संपूर्ण महिला प्रवाशांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा अन्याय केला आहे. हा निर्णय एकतर्फी घेण्यात आलेला आहे. रेल्वेने हा निर्णय घेताना सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याच्या आधारे वेळापत्रक तयार करण्यात आले. मात्र आम्ही या संबंधित पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजय मिश्रा यांना भेटून आमच्या मागण्याचे निवेदन दिले आहे. पश्चिम रेल्वेने आमच्या निवेदनावर दखल घेतलेली नाही. त्यामुळे आम्हाला आता रेल्वे विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहेत.
अँड. मृदुला खेडेकर – सामाजिक कार्यकर्ता – वसई

पश्चिम रेल्वेने नवे वेळापत्रक जाहीर केले असून त्याला आमचा विरोध नाही. मात्र जोगेश्वरी फलाट क्रमांक ४ वर गोरेगावच्या ४ तर मालाडच्या २ अशा ६ लोकल थांबत होत्या. मात्र त्या लोकल्स हॉल्ट हार्बर मार्गवरील फलाट क्रमांक ६ देण्यात आला असल्यामुळे प्रवाशांना स्टेशनला संपूर्ण फेरी मारून स्टेशनवर जावे लागणार आहेत. जर तिथे लोकल सापडली नाही तर उलट जोगेश्वरी पश्चिम मार्गवर यावे लागणार आहेत. त्यामुळे रेल्वेनी यावर लक्ष देऊन हा निर्णय मागे घ्यावा.
मन्सूर उमेर दरवेष- द पॅसेंजर अँड ट्रॅफीक रिलीफ असोसिएशन

लोकल सुरु करण्यासाठी आम्ही स्वाक्षरी उपक्रम सुरु केला होता. सोबतच मागील ६ महिन्यापासून आम्ही मागणीचे पाठपुरावा करत होतो. त्याला पश्चिम रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहेत. सोबतच मनसेचे सर्व पदाधिकार्‍यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात यासाठी प्रयत्न केल्यामुळे आज लोकल सेवा सुरु झाली आहेत. त्यामुळे नालासोपारा – विरारच्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे, यासाठी पश्चिम रेल्वेचे आभार व्यक्त करतो.
मनोहर कदम- मनसेचे विरार शहर संघटक

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -