घरमहाराष्ट्रएसटी महामंडळामध्ये ८,०२२ पदांची भरती

एसटी महामंडळामध्ये ८,०२२ पदांची भरती

Subscribe

एसटी महामंडळातील नोकरीमुळे ग्रामीण भागातील होतकरु आणि गोरगरीब तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे. यामध्ये अनेक युवतीही एसटीच्या नोकरीसाठी पुढे येताना दिसत आहेत.

एसटी महामंडळामार्फत सध्या चालक आणि वाहक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीप्रक्रियासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खूशखूबर आहे. या भरतीमध्ये आता हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. याबरोबरच महिला उमेदवारांना शारीरीक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली असून ही अट किमान १६० सेंमीवरुन किमान १५३ सेंमी करण्यात आली आहे. तसेच पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट शिथील करण्यात आली असून ३ वर्षाऐवजी १ वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवारही अर्ज करु शकणार आहेत.

अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

महामंडळामार्फत राज्यात सध्या ८ हजार २२ इतक्या चालक आणि वाहन पदाची भरती सुरु आहे. यापैकी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ तर उर्वरीत जिल्ह्यांमध्ये ३ हजार ६०६ इतकी पदे भरली जाणार आहेत. दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या नियोजनानुसार अर्ज करण्याची मुदत ८ फेब्रुवारी रोजी संपणार होती. इतर जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी संबंधीत जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परिक्षा होणार आहे.

- Advertisement -

गोरगरीब तरुणांना रोजगाराच्या संधी

दिवाकर रावते यांनी असे सांगितले की, ‘महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने नेहमीच आग्रहाची भूमिका घेतली आहे. महामंडळामार्फत नुकतीच २१ आदिवासी युवतींची बसचालक पदावर भरती करण्यात आली आहे. या युवतींचे सध्या प्रशिक्षण सुरु असून त्या लवकरच एसटीच्या बसेस चालवताना दिसतील. महामंडळातील नोकरीमुळे ग्रामीण भागातील होतकरु आणि गोरगरीब तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे. यामध्ये अनेक युवतीही एसटीच्या नोकरीसाठी पुढे येताना दिसत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

अनेक अटी केल्या रद्द

‘सध्या सुरु असलेल्या भरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी आज अखेर २८९ महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. महामंडळाने अधिकाधिक महिला उमेदवारांना या भरती प्रक्रियेत स्थान देण्याच्या उद्देशाने आज काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. सध्या या पदासाठी महिला उमेदवारांनाही अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक होते. ही अट रद्द करण्यात आली आहे. परिक्षेअंती ज्या महिलांची निवड होईल त्यांना महामंडळामार्फत १ वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना महामंडळामार्फत विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रितसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकतील’, असे रावते यांनी सांगितले.

- Advertisement -

अनुभवाच्या अटीतही शिथीलता देण्याचा निर्णय

‘चालक आणि वाहक पदासाठी पुरुष उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या अनुभवाच्या अटीमध्ये आता शिथीलता करण्यात आली आहे. त्यानुसार अवजड वाहन चालविण्याचा १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवारही या पदासाठी आता अर्ज करु शकतात. तसंच अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षाचा अनुभव असलेले पुरेसे उमेदवार मिळत नसल्याचे मागील भरती प्रक्रियेत दिसून आले होते. त्यामुळे ही अट शिथील करण्यात येत असल्याचे’, रावते यांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -