घरमुंबईअपघातातील मृतांच्या कुटुंबीयाला नाकारली आर्थिक मदत

अपघातातील मृतांच्या कुटुंबीयाला नाकारली आर्थिक मदत

Subscribe

नैसर्गिक आपत्ती नसल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण

आपल्या अ‍ॅक्टिव्हा स्कुटरने रस्त्याने जात असताना खड्ड्यात पडल्याने समाजसेवक भरत खरे यांना 13 फेब्रुवारी 2019 रोजी जीव गमवावा लागला होता. रस्त्यातील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याने मनपा प्रशासन याला जबाबदार असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला होता. मनपाकडून खरे कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि तसा प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आला होता. मात्र, मनपा प्रशासनाने ही मदत नाकारली आहे. शासन नियमात अशा स्वरूपाची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

उल्हासनगर- 4 येथे लाल चक्की परिसरात राहणारे भरत खरे हे दुचाकीवरून राधास्वामी सत्संग चौक कडून फालवर लाईनच्या दिशेने येत असताना रस्त्यातील एका खड्ड्यात त्यांची गाडी आदळली. यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना बेशुद्ध अवस्थेत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना डोंबिवलीच्या एम्स आणि नंतर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले गेले. या रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर 15 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 6 वाजता त्यांची प्राणज्योत माळवली.

- Advertisement -

मनपाच्या सर्वसाधारण सभेत भरत खरे यांच्या अपघात प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले, शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे आणि राजेंद्र चौधरी यांनी आरोप केला की भरत खरे यांच्या मृत्यूला उल्हासनगर महानगरपालिका जबाबदार आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्त्यांवर आणि रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी केला जातो. मात्र, तरीदेखील खड्डे कायम असतात. भाजप नगरसेवक डॉ. प्रकाश नाथानी म्हणाले होते की, खड्ड्यांमुळे महानगरपालिका अखेर किती जणांचे बळी घेणार? महापालिकेच्या निष्काळजीमुळेच भरत खरे यांचा जीव गेल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद टाले यांनी केला व खरे यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली होती. या मागणीला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. पालिका उपायुक्त विकास चव्हाण यांनी प्रशासनाने 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीरदेखील केली होती. या घटनेला जवळपास महिना झाला. मात्र, अद्यापदेखील खरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली नाही. यासंदर्भात मनपा आयुक्त अच्युत हांगे यांना विचारले असता ते म्हणाले की,भरत खरे यांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेचे आम्हालाही दुःख आहे. मात्र, अशाप्रकारची मदत शासनाच्या नियमात बसत नाही, मेमसाब या इमारत अपघातातदेखील 3 जणांचा मृत्यू झाला होता त्यांनादेखील आम्ही मदत करू शकत नाही. दोन्ही घटना या नैसर्गिक आपत्ती किंवा तत्सम प्रकारात मोडत नाहीत, असे हांगे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -