घरताज्या घडामोडीराजकारणात नवा ट्विस्ट राऊत आणि फडणवीस यांच्यात गुप्त बैठक

राजकारणात नवा ट्विस्ट राऊत आणि फडणवीस यांच्यात गुप्त बैठक

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल दोन तास त्यांच्यात ही बैठक झाल्याचे समजते. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या गुप्त बैठकीमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार का? अशीही चर्चा रंगली आहे.

शनिवारी दुपारच्या दरम्यान ही बैठक झाली असून, संजय राऊत यांनी मात्र ही भेट झाल्याचे नाकारले आहे. या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, आपण हॉटेलमध्ये होतो. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नाही, असे संजय राऊत म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असतील त्याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे म्हणत राऊतांनी हा विषय टाळला. दरम्यान, संजय राऊत यांनी भेटीचे वृत्त नाकारले असले तरी, पुढील आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांची दैनिक ‘सामना’मध्ये मुलाखत छापून येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

‘बंद दाराआड’ झालेल्या गुप्त बैठकीचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीचे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक विषयांवरून भाजप आणि सत्ताधार्‍यांमध्ये शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळाला. तर आज संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

बिहार निवडणुकांनंतर महाराष्ट्रात भूकंप

राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीबद्दल भाजपकडून अधिकृत खुलासा देण्यात आला तरी फडणवीस यांना विरोधी पक्षनेता म्हणून रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ ही संजय राऊत यांच्यामुळेच आल्याचे चर्चा भाजपाच्या गोटात आहे. फडणवीस हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे थेट आक्रमक होत नाहीत; पण झालेला अपमानही ते विसरत नाहीत. मात्र, राजकारण हेच अनिश्चिततेच्या पायावर उभे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यपद्धतीनुसार फडणवीस हे राऊत यांना भेटले असतील; पण बिहार निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात भूकंप होणार हे मात्र नक्की, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘आपलं महानगर’शी बोलताना केला. मात्र, भाजपला पुन्हा सत्तेत येण्यासाठी केवळ ३० आमदारांची आवश्यकता असून ते महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमधून असतील हे मात्र नक्की, असे सांगण्यासही हा नेता विसरला नाही.

- Advertisement -

भेटीला राजकीय संदर्भ नाही
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.
– प्रवीण दरेकर,विरोधी पक्षनेता, विधान परिषद

देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांची भेट झाल्याची मला कसलीही माहिती नाही. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. राजकीय क्षेत्रात अशा भेटी होत असतात. त्यात बातमी असते असे नाही. गेली नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी, आम्ही पुन्हा सरकार बनवणार असे म्हटले नाही. हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडणार, असे आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही. ती आमची संस्कृती नाही.
– आ. चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -