घरताज्या घडामोडीहाथरसमध्ये आणीबाणी

हाथरसमध्ये आणीबाणी

Subscribe

उत्तर प्रदेशमधील हाथरसला १९ वर्षांच्या दलित मुलीबरोबर माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. बलात्कार आणि ठार मारण्याच्या उद्देशाने केलेली मारहाण यामुळे ती १५ दिवस रुग्णालयात मृत्यूशी लढा देत राहिली, परंतु, सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतरही पीडितेसोबत जी वागणूक झाली, ती माणुसकीला काळीमा फासणारी होती. तिचा मृतदेह कोणत्याही अंतिम संस्काराशिवाय पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळून टाकला. शिवाय शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचा उल्लेख आल्यामुळे हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचे झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारवर चारीबाजूंनी टीका होत असताना आता राजकीय नेते आणि पत्रकारांना गावबंदी करण्यात आली असून जणू काही हाथरसला आणीबाणी घोषित केल्याचे चित्र आहे.

पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यापासून तिच्या गावाला छावणीचे स्वरुप आले आहे. पीडितेचे घर, छत, गल्ली सर्व ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावर कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल हिसकावून घेण्यात आले. मीडियाला काही सांगू नये यासाठी त्यांना धमकावण्यात आले. शुक्रवारी पीडितेचा लहान भाऊ पोलिसांपासून लपून मीडियापर्यंत पोहचला, यावेळी त्याने त्यांच्या घरावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली.

- Advertisement -

हाथरस जिल्हा प्रशासनाने गाव आणि जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. पीडितेचा भाऊ गवत कापायच्या बहाण्याने घराबाहेर पडला आणि दीड किलोमीटर दूर असलेल्या मीडियाशी बातचीत केली. त्याने सांगितले की,‘घरातील सर्वांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. माझ्या कुटुंबाला मीडियाशी बोलायचे आहे, पण पोलीस येऊ देत नाहीत. मी पोलिसांना चकवा देऊन इथपर्यंत आलो. माझ्या काकालाही मीडियाशी बोलायचे होते, पण पोलिसांनी त्यांना मारहाण केली.’ पीडितेचा भाऊ मीडियाशी बोलत होता, तेवढ्यात एका पोलिसाची त्याच्यावर नजर पडली आणि तो पळून गेला.

मीडियावर बंदी

- Advertisement -

यूपी काँग्रेसने ट्वीट करून योगी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यात लिहिले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी अदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये मीडियाच्या येण्यावर बंदी घातली आहे. मीडियाने संपूर्ण देशासमोर सत्य आणले. योगीजींच्या जंगलराजचा खुलासा सर्व देशासमोर केला, त्यामुळे यूपीमध्ये माध्यमांवर बंदी घातली आहे.

हाथरसच्या जिल्हाधिकार्‍याने धमकावले

हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराप्रकरणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते पीडित कुटुंबाला इशारा देत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी सांगत आहेत,‘तुमची विश्वासार्हता टिकवा. मीडिया आज आहे, उद्या निघून जाईल. तुम्ही सरकारचे ऐका. तुम्ही आपली साक्ष बदलू नका. तुमची इच्छा आहे, काय भरोसा, उद्या आम्हीपण बदलून जाऊ.’

त्यांना अशी शिक्षा केली जाईल की…योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. अशातच आता योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे या प्रकरणावर भाष्य केलं आहे. उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणार्‍याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे, असं योगी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक निलंबित
हाथरस प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक कारवाई करत हाथरसचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. प्राथमिक तपासाच्या आधारावर योगी यांनी ही कारवाई
केली आहे.

शिवसेना आक्रमक, मोदी सरकार हाय हाय!

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. चर्चगेट स्टेशनसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून सुशांत सिंह प्रकरणी शिवसेनेवर आरोप होत असताना आता हाथरसचा मुद्दा समोर ठेवून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आणि मोदी सरकार हाय हायच्या घोषणा दिल्या. शिवसेना नेते शिशिर शिंदे हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या निदर्शनांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -