घरताज्या घडामोडी...तर जयंत पाटील भाजपत दिसले असते

…तर जयंत पाटील भाजपत दिसले असते

Subscribe

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भाजपत दिसले असते, असा दावा करतानाच जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही झाली होती, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला.

जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे ती मी तिथेच उघड करणार आहे, असेही राणे म्हणाले. पुढचं सरकार आमचंच येणार असे जयंत पाटील म्हणताहेत. कदाचित पुढील सरकारमध्येही मी मंत्री असणार असे त्यांना म्हणायचे असेल, असा टोलाही राणे यांनी लगावला.

- Advertisement -

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने त्यांनी असंख्य मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीका केली. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, अ‍ॅड. बाबा परुळेकर उपस्थित होते.

दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केलेली नाही. खुनाला आत्महत्या करण्यात ठाकरे सरकारला अधिक स्वारस्य आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. उध्दव ठाकरे यांच्या पायगुणाने कोरोना आला. बाकी कशात नाही; पण कोरोनामुळे झालेल्या मृतांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, अशी टीका करतानाच त्यांनी आरोग्य, शिक्षण, शेतकर्‍यांना मदत यासारख्या सर्वच विषयांमध्ये हे सरकार अपयशी झाल्याचा दावा केला.

- Advertisement -

आपल्या सरकारने वर्षपूर्ती केल्याची मुलाखत देताना त्यांनी वर्षभरात सरकारने काय ठोस केले, याची माहितीही देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरकारने १२ हजार कोटी खर्च केल्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्यातील असंख्य कामे आपल्याच नातेवाईकांना देऊन सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -