घरताज्या घडामोडीवाढत्या कोरोनाने राज्यात पुन्हा निर्बंध, दोन दिवसांत निर्णय

वाढत्या कोरोनाने राज्यात पुन्हा निर्बंध, दोन दिवसांत निर्णय

Subscribe

कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे टळले नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा दिला आहे. कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही सांगताना त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांचे उदाहरण दिले होते. तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही तिच इच्छा असल्याचे सांगितले आहे. निर्बंध लावण्याबाबत येत्या दोन दिवसांत घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचे, राजेश टोपे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन लावण्यात येणार नसला तरी शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राजेश टोपे यांनी यावेळी लग्न समारंभात २०० नागरिकांची संख्याही कमी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजेश टोपे यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपनगरी रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. राज्यात दिवाळी खरेदीसाठी व अन्य वेळीही बाजारपेठांमध्ये उसळत असलेली गर्दी, चौपाट्या, समुद्रकिनारे व अन्य पर्यटनस्थळी, सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी यामुळे कोरोना प्रसार वाढत आहे. शाळा- महाविद्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करणे, पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही नियम न पाळता विनाकारण फिरणार्‍यांना प्रतिबंध करणे, सार्वजनिक ठिकाणी अनिर्बंध किंवा मुक्त वावर नियंत्रित करणे, विवाह व अन्य समारंभांसाठी पुन्हा २०० वरून ५० नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा देणे, मुखपट्टी न वापरणार्‍यांना दिल्लीच्या धर्तीवर अधिक दंड आकारणी करणे, अशा अनेक बाबींवर मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकार्‍यांबरोबरच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -