…तर महाविकास आघाडी नकोच, ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली

मिशन कळवा जर राष्ट्रवादीला झोंबले असेल, तर आघाडी होईल किंवा नाही होईल. यापुढे मिशन मुंब्रा, वागळेच नव्हे ,तर बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेना मिशन ठाणे महापालिका राबविणार असल्याचा दावाही महापौरांनी केला.

Shiv Sena-NCP leaders arguement on kalwa kharegaon flyover inauguration
...तर महाविकास आघाडी नकोच, ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली

कळवा-खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. या पुलामुळे हे दोन्ही पक्ष जोडले जाण्याऐवजी हे पूल दोन्ही पक्षातील नेते शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांची मैत्री तोडण्यासाठी कारणीभूत ठरतो का? अशी चर्चा ठाण्यातील राजकारणात रंगली आहे. या पुलाच्या उद्घाटनानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांनी विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर तर ठाण्यात महाविकास आघाडी नकोच, अशी टोकाची भूमिका शिवसेनेचे नेते आणि ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली आहे.

माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांनी विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करताना, वडिलांची चप्पल मुलाने घातली म्हणजे वडिलांची अक्कल मुलामध्ये येतेच असे नाही, अशी टीका केली. या टीकेला शिवसेनेने रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिले, बाप आणि चप्पल बदलणार्‍यांनी शिवसेनेने शिवसेनेला शिकवू नये, असा जोरदार टोला शिवसेनेने आनंद परांजपे यांना लगावला. मात्र, रविवारीही ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील शाब्दीक टीकायुद्ध सुरूच राहिल्याने वादाची ही आग भडकल्यास ठाण्यात शिवसेना राष्ट्रवादीतील मैत्रीचे पर्व संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यामुळे आम्ही शांत होतो. पण वारंवार पत्रकार परिषदा घेऊन वादाची ठिणगी जर लावणार असाल तर आग भडकणारच आहे. त्यातच आघाडीबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल. पण अशीच आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू राहिल्यास मला वैयक्तिकरित्या महाविकास आघाडी नको, असे परखड मत ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा महापौर नरेश म्हस्के यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. याचदरम्यान मिशन कळवा जर राष्ट्रवादीला झोंबले असेल, तर आघाडी होईल किंवा नाही होईल. यापुढे मिशन मुंब्रा, वागळेच नव्हे ,तर बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेना मिशन ठाणे महापालिका राबविणार असल्याचा दावाही महापौरांनी केला.

निधीसाठी नारद चालतो का?

रविवारी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांवर टीका केली. त्यानंतर महापौर म्हस्के यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे आणि योगेंद्र जानकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. त्यावेळी, त्यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना, महापौरांनी कलियुगातील कलींना पुरुन उरण्यासाठी या नारदाची गरज असल्याचेही ते म्हणाले. निधी पाहिजे असल्यास नारदमुनी चालतो का? असा सवालही महापौरांनी उपस्थित केला. तसेच मी शिवसेनेत नसतो तर महापौर झालो नसतो. त्यामुळे पक्षासाठी काम करणे हे आपले कर्तव्य आहे. तर आघाडीतील खर्‍या अर्थाने नारदमुनी हे आनंद परांजपे असल्याचे विकास रेपाळे म्हणाले.

माहिती घेऊन आरोप करा – महापौर

स्मार्ट सिटीमध्ये आपल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेतेही संचालक आहेत. ही कंपनी कायद्याप्रमाणे चालत असून त्याच्या कामकाजाची माहिती करून घ्यावी, मगच कमिशनचा आरोप करावा, असेही महापौर म्हस्के म्हणाले.