घरसंपादकीयअग्रलेखमोदी नको, मग दुसरा कोण?

मोदी नको, मग दुसरा कोण?

Subscribe

एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही, असे भाजपवाले म्हणत आहेत, तर दुसर्‍या बाजूला विरोधात असलेले अनेक पक्ष नरेंद्र मोदींना पर्याय उभा करण्यासाठी महासंघटन उभारण्यासाठी झटत आहेत. जो महाविकास आघाडीचा प्रयोग करून महाराष्ट्रातील सत्ता भाजपकडून काढून घेण्यात आली तोच प्रयोग अधिक व्यापकतेने राष्ट्रीय पातळीवर वापरून केंद्रातूनही भाजपला हटवता येईल, असा विश्वास बाळगून काँग्रेससोबतच अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रादेशिक पक्षांचे नेते एकमेकांना भेटून आपण मोदींना हटवले पाहिजे, यासाठी चर्चा आणि विचारविनिमय करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उद्धव ठाकरे यांना भेटून गेले, त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात टीव्ही चॅनेलवर आपल्या सरकारच्या विकासकामांची जोरदार जाहिरातबाजी करत असतात.

काही वेळा ते महाराष्ट्रात सभा घेत असतात. त्यांनी भारत राष्ट्र समितीची स्थापना केलेली आहे. आपल्या पक्षाचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर करून आपल्याला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याचे संकेत ते देत आहेत. ममता बॅनर्जी काही वेळा महाराष्ट्रात येऊन जात असतात. महाराष्ट्रात आणि दिल्लीच्या राजकारणात अनेक वर्षे मुरलेल्या शरद पवार यांना भेटून मोदी हटावची रणनीती आखत असतात. त्यात पुन्हा गोम अशी आहे की, जेव्हा राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी स्थापन करून सत्ता मिळवायची असते तेव्हा त्या तिसर्‍या आघाडीला भाजप किंवा काँग्रेस या राष्ट्रीय पातळीवर प्रभाव असलेल्या पक्षांचा पाठिंबा लागतो, त्याशिवाय ते शक्य नसते. हे मागील काळात दिसून आलेले आहे, त्यासाठी विरोधात असलेल्या विविध पक्षांना काँग्रेसला आपल्यासोबत घ्यावे लागणार आहे, पण ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्यामधून विस्तव जात नाही. ममता बॅनर्जी यांना कोण समजावणार हा मोठा प्रश्न आहे. त्या तर राहुल गांधी यांच्यावर थेट बोचरी टीका करतात. असे असेल तर काँग्रेस तिसर्‍या आघाडीच्या जवळ कसा येणार हा प्रश्न आहे.

- Advertisement -

त्यात पुन्हा काँग्रेसजनांना काहीही करून राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. त्यासाठीच त्यांना पक्षाचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष करण्यात आले होते. पण मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दुसर्‍यांदा जो मोठा पराभव झाला, त्याचा धसका घेतलेल्या राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा त्याग केला होता. आता मोदींवर केलेल्या मानहानीकारक टीकेमुळे त्यांना खासदारकी गमवावी लागली आहे. त्यात पुन्हा राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्याचा जो सपाटा लावला आहे, त्यामुळे विशेषत: महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शिवसेनेची पंचाईत झालेली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी नुकतीच विरोधी पक्षांची बैठक झाली, त्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचा सहकारी पक्ष शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. ममता बॅनर्जी या काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्याप्रमाणेच काँग्रेसमधून फुटून निघालेल्या आहेत, पण शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसशी पुन्हा हातमिळवणी केली, पण ममता बॅनर्जी तशी तडजोडीची भूमिका घ्यायला तयार नाहीत, ही तिसर्‍या आघाडीच्या स्थापनेमधील मोठी अडचण आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेसुद्धा पंतप्रधान होण्यासाठी उत्सुक होते आणि आहेत. त्यांनी मोदींना जेव्हा भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रीय पातळीवर आणले तेव्हा नितीश कुमारांनी आपल्या आकांक्षांचे बिगुल वाजवून दाखवले होते, पण आपल्या मर्यादा आहेत, याची त्यांना कल्पना आल्यानंतर त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर राहणे पसंत केले. मोदींची जमेची बाजू अशी आहे की, त्यांच्याकडे जसे जनमतावर प्रभाव पाडू शकणारे नेतृत्व आहे, त्याचसोबत त्यांना भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष आणि देशभर विविध शाखा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे. काँग्रेस हादेखील जुना राष्ट्रीय पक्ष आहे, पण त्यांचा प्रभाव सध्या कमी झालेला आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना विरोधी बाकांवर बसण्यासाठी जेवढ्या किमान जागा लागतात, तितक्याही जिंकता आलेल्या नाहीत.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी मोदींवर कितीही आरोप केले तरी त्याचा काही उपयोग होत नव्हता, शेवटी यांनी महात्मा गांधी यांच्या दांडीयात्रेचे अनुकरण करण्याचे ठरवले. त्यातूनच दांडीयात्रेच्या धरतीवर पायी ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यात आली. या काळात राहुल गांधी यांना लोकांचा प्रतिसाद लाभला. नेता आल्यावर लोक गर्दी करतात, पण त्याचे मतांमध्ये रुपांतर होईलच, असे नाही. याचा अनुभव राहुल गांधी यांनी यापूर्वी घेतलेला आहे. भाजप आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांसोबत देशातील लोकशाही नष्ट करू पाहत आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. मोदी हटाव, यावर विरोधकांचे एकमत आहे, पण मोदींना बाजूला सारले तर त्यांच्या जागी कोण, हा लोकांच्या मनातील प्रश्न आहे. कारण लोकांना स्थिर सरकार हवे असते. मोदी विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाचे अनेक दावेदार आहेत. त्यामुळे मोदी विरोधातील नेते एकत्र कसे येणार आणि समजा ते एकत्र आले तर पंतप्रधान म्हणून कुणाचे नेतृत्व मान्य करणार हा गहन प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -