राहुल गांधींकडून देशाची बदनामी पेगाससवरून अनुराग ठाकूर यांचे टीकास्त्र

अनुराग ठाकूर

काँग्रेस खासदार राहुल गांधी परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. पेगासस त्यांच्या फोनमध्ये नाही तर डोक्यात असल्याची टीका करीत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ईशान्येकडील तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. तरीही काँग्रेस जनादेश स्वीकारण्यास तयार नाही. देशातील लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जास्त विश्वास असल्याचे या निकालांवरून पुन्हा स्पष्ट झाले, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

राहुल गांधींच्या फोनमध्ये जर पेगासस होता तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन केलेल्या तांत्रिक समितीकडे आपला फोन का सादर केला नाही, असा प्रश्नही अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला. आपला फोन जमा करण्यात त्यांना नेमकी काय अडचण होती हे राहुल गांधी यांनी सांगायला हवे. काँग्रेसमधील इतर नेत्यांनीसुद्धा पेगाससबद्दल दावे केले, मात्र त्यापैकी कोणीही फोन जमा केला नाही, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

पेगाससद्वारे झाली हेरगिरी
राहुल गांधी यांनी गुरुवारी लंडनच्या केंब्रिज विद्यापीठात एमबीएच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देताना आपल्या फोनद्वारे हेरगिरी झाल्याचे सांगितले. माझी आणि विरोधी पक्षनेत्यांची पेगाससद्वारे हेरगिरी होत असल्याची माहिती गुप्तचर अधिकार्‍यांनी मला दिली. त्यांनी आपल्याला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिल्याचेही राहुल गांधी म्हणाले होते.