घरदेश-विदेशबॉर्डरवर टेन्शन!

बॉर्डरवर टेन्शन!

Subscribe

काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या १०० तुकड्या, नौशेरा सेक्टरमधील २७ गावे खाली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर सीमारेषवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्यांकडून सीमारेषेवर कारवाया सुरू आहेत. तर, भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या पाठविण्यात येत असून सुमारे 10 हजार जवान तिथे निघाले आहेत. तर काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमधील 27 पेक्षा अधिक गावे खाली करण्यात आली आहेत.

सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्याकडून चकमकी सुरूच आहेत. बुधवारी आणि गुरूवारी सीमा रेषेवर झालेल्या गोळीबारांनंतर येथील गांवांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या गावातील स्थलांतरीतांना आवश्यक ते सामान सोबत घेण्यास बजावले असून शाळा आणि सरकारी भवनांमध्ये आश्रय देण्यात येत आहे.

- Advertisement -

पाकिस्तानी सीमारेषेपासून दूर असलेल्या ठिकाणी या गाववाल्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एलओसीजवळी गावांना खाली करण्यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, येथील गावकरी आपल्याच गावात राहण्यास उत्सुक असल्याचे राजौरी जिल्ह्याचे पोलीस उप-आयुक्त मोहम्मद एजाज असद यांनी गावचा दौरा केल्यानंतर म्हटले आहे. मात्र, सुरक्ष जवानांकडून त्यांना सरकारी योजनांची माहिती देण्यात येत असून त्यांचे मन विळविण्यात येत असल्याचेही असद यांनी सांगितले.

दरम्यान, पाकिस्ताननेही सीमेवरील गावे अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला असून, त्या ठिकाणी लष्करातर्फे बंकर उभारण्याची सुरुवातही केली आहे. भारतातर्फे पाकिस्तानवर हल्ला होईल, अशी भीती त्या देशात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील सभेत म्हणाले की, पुलवामाचा बदला कसा घ्यायचा, हे लष्कराला माहीत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर 100 तासांच्या आत हल्ल्याला मदत करणार्‍यांना जिथे पाठविणे गरजेचे होते, तेथे जवानांनी धाडले आहे. लष्कराला सरकारने पूर्ण मोकळीक दिली आहे. पाकिस्तानविरोधी लढ्याचे सारे मार्ग आम्ही खुले ठेवल्याचे अर्थमंत्री जेटली यांनीही नमूद केले.

- Advertisement -

काश्मीरमध्ये हायअलर्ट
संपूर्ण काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा जम्मू-काश्मीरमध्ये तत्काळ प्रभावाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 100 अतिरिक्त कंपन्या तैनात करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. यात 45 सीआरपीएफ, 35 बीएसएफ, 10 एसएसबी आणि 10 आयटीबीटीच्या कंपन्यांचा समावेश आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था
गेल्या 24 तासांपासून जम्मू-काश्मीरमधील जलद गतीने बदलणारी परिस्थिती पाहता भारताकडून खोर्‍यात मोठी आणि निर्णायक कारवाई होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. खोर्‍यातील फुटिरतावादी नेत्यांवर मोठी कारवाई करत यासीन मलिकसह जमात-ए-इस्लामीच्या सुमारे 24 नेत्यांना अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त खोर्‍यात गेल्या तीन दशकांनंतर सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

तीन अतिरेकी ठार, डीएसपी शहीद
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात तारिगाम येथे रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या भागात तीन अतिरेकी लपले असण्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलानं खात्मा केला. तर डीएसपी अमन ठाकूर या चकमकीत शहीद झाले. तर लष्कराचा एक अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. काही दहशतवादी तारिगाम भागात लपले असल्याची खबर सैन्याला मिळताच या क्षेत्राला घेराव घालण्यात आला. सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरू होती. तेवढ्यात दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरूवात केली. त्याला सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं.

अफवांवर विश्वास ठेवू नका
सध्या काश्मीरमधील काही भागांत निवडणुका होत आहेत. त्यासाठी सैन्याची अतिरिक्त कुमक काश्मीरच्या सीमाभागात मागविण्यात आली आहे. त्यामुळे काश्मीरमधील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच देशातील सर्वच नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन राज्यपाल सत्तपाल मलिक यांनी केले आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -