घरदेश-विदेशम्हणून सैनिकांनी बंदूका टाकून खडू उचलला

म्हणून सैनिकांनी बंदूका टाकून खडू उचलला

Subscribe

झारखंड राज्यात गेल्या काही दिवसांपासून ६० हजाराहून अधिक कंत्राटी शिक्षक संपावर गेल्यामुळे राज्यातील शाळांमध्ये अभुतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना आश्चर्यकारक आणि सुखद धक्का देणारी घटना झारखंडमध्ये घडली आहे. देशाचे रक्षण करणारे सैनिक आता शिक्षणदानाचे देखील काम करताना झारखंडमध्ये दिसून आले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी रामगढ जिल्ह्यात शाळांमध्ये जाऊन मुलांना धडे शिकवले आहेत.

सैनिकांनी आपल्या हातातील बंदूका खाली ठेवून खडू उचलल्यामुळे झारखंडमध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. देशाच्या रक्षणासोबतच आपले सैनिक देशसेवेसाठी कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचा संदेशही यातून दिला गेला आहे. सैनिक तसे हे नेहमीच बंदूका आणि दारूगोळ्याशी दोन हात करत असतात, मात्र यावेळी सैनिकांनी राज्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खडू आणि पेन हाती घेतला आहे. झारखंडच्या नक्षलप्रभावित असलेल्या भागातील शाळांमध्ये सैनिकांनी हे शैक्षणिक कार्य सुरु केले आहे.

- Advertisement -

रामगढ जिल्ह्यातील राजकीय क्रित मध्य विद्यालयाचे मुख्याध्यापक राम सरन यादव यांनी सांगितले की, “आमच्या शाळेतील पाचही शिक्षक संपावर गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा तास घ्यायला कुणीही नाही. त्यामुळेच सीआरपीएफच्या २६ बटालियनचे जवान इथे नेमले गेले आहेत. शाळेतील तासिका घेणे तसेच इतर दैनंदिन शैक्षणिक कार्यात जवान मदत करत आहेत.”

झारखंडमध्ये तब्बल ६७ हजार कंत्राटी शिक्षक आहेत. यातील ९६ टक्के शिक्षक संपावर गेलेले आहेत. त्यामुळे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक कार्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून इतर पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. सेवानिवृत्त शिक्षक, बीएड आणि डीएलएड करत असलेले विद्यार्थी यांना शाळांवर तात्पुरती नेमणूक देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. या सर्वांना २०० ते २५० रुपये प्रतिदिन मानधन दिले जाईल आणि हे मानधन कंत्राटी शिक्षकांच्या पगारातून कापण्यात येईल, असेही राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

शिक्षक संपावर ठाम

दुसरीकडे ६० हजार आंदोलनकर्ते संपावर ठाम असून आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिकाच त्यांनी घेतली आहे. तसेच २५ नोव्हेंबर रोजी भाजपचे खासदार, आमदार आणि मंत्र्यांच्या घरांना घेराव घालणार असल्याचे कंत्राटी शिक्षकांच्या संघटनांनी जाहीर केले आहे.

सध्या देशभरात विविध राज्यांमध्ये कंत्राटी शिक्षकांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. महाराष्ट्रातही शंभर टक्के अनुदानासाठी शिक्षक आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -