घरदेश-विदेश२०१९ मध्ये मोदी लाट नसेल, प्रशांत किशोर यांचे सूतोवाच!

२०१९ मध्ये मोदी लाट नसेल, प्रशांत किशोर यांचे सूतोवाच!

Subscribe

२०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारे प्रशांत किशोर यांनी यंदा मात्र मोदी लाटेची शक्यता नाही असे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्याची मुख्य धुरा सांभाळणारे प्रशांत किशोर यांनी महत्त्वपूर्ण सूतोवाच केले आहे. २०१९मध्ये २०१४सारखी मोदी लाट नसेल, असं वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केलं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची वाट खडतर असणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. प्रशांत किशोर सध्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. पक्षीय राजकारणातून त्यांनी हे वक्तव्य केले असेल अशी शंका जरी आता व्यक्त होऊ लागली असली, तरी मोदींचं संपूर्ण निवडणूक कॅम्पेन हाताळणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं मानलं जात आहे.

‘एकट्या भाजपकडून हे शक्य नाही!’

‘काँग्रेसला चारीमुंड्या चीत करणारी २०१४ची मोदी लाट आता अडचणीत आली आहे’, असे सूतोवाच किशोर यांनी केले आहेत. ‘मोदी सध्या जरी आघाडीवर असले, तरी १०-१२ दिवसांमध्ये निवडणुका बदलतात. त्यामुळे अगदी आज जरी निवडणुका झाल्या तरी भाजप सर्वात मोठा पक्ष निश्चितच असेल, मात्र २७२ जागांचा बहुमताचा आकडा गाठणं एकट्या भाजपला शक्य होणार नाही’, असंही किशोर यावेळी बोलताना म्हणाले. एका वृत्तसमूहाच्या संवादात बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

- Advertisement -

‘लोकांना आश्वासनांचा हिशोब हवा आहे’

यावेळी बोलताना किशोर यांनी भाजपच्या जुमलेबाजीवरही खोचक शब्दांत अप्रत्यक्ष टीका केली. ‘लोकानुनयी आश्वासनं आता लोकांना नको आहेत. त्यांना खरी आश्वासनं हवी आहेत. दिलेल्या आश्वासनांचा हिशोब हवा आहे. आता लाटेवर नसून लोकांशी संबंधित छोट्या छोट्या मुद्द्यांवर निवडणूक होईल’, असं किशोर यावेळी म्हणाले.

कोण आहेत प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर यांनी भारतीय राजकारणात येण्यापूर्वी ८ वर्ष संयुक्त राष्ट्रांसोबत काम केलं आहे. २०१२मध्ये मोदींना तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आणण्यात त्यांच्या निवडणूक प्रचार रणनीतीचा मोठा हातभार होता. मात्र, २०१४च्या भाजपच्या आणि मोदींच्या प्रचारासाठी त्यांनी आखलेली रणनीती भाजपला मोदी लाटेवर स्वार होण्यात महत्त्वाची पायरी ठरली.

- Advertisement -


हेही वाचा – भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा भाजपच्याच सभेत राडा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -