Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश कर्नाटकचा भाजपला धक्का

कर्नाटकचा भाजपला धक्का

Subscribe

घटक पक्षांशी जुळवून घेण्याचे आदेश

समविचारी पक्ष एकत्र आल्यास सत्तेचे काही खरे नाही, याची जाणीव झालेल्या भाजपने कर्नाटकमधील पराभव चांगलाच मनावर घेतला आहे. याआधी उत्तर प्रदेशनंतर आता कर्नाटकातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाने भाजपने एनडीएची पुनर्रचना करण्याचा विचार चालवल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेसह नाराज असलेल्या घटक पक्षांशी संमजस भूमिका घेऊन तातडीने हालचाली करण्याच्या सूचना विविध राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकमधील लोकसभेची पोटनिवडणूक हा सरकारविरोधातील नाराजीचा स्पष्ट इशारा असल्याचे भाजपतील नेत्यांचे म्हणणे आहे. यामुळेच निवडणुकीआधी पक्षाने हे गंभीरपणे घेतले पाहिजे, अशा सूचना संघातून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ताब्यातील तीन जागांवर दारूण पराभव पत्कारावा लागला. विरोधक एकत्र आल्यास या पक्षांचा फायदा होतो, हे याआधीच्या निवडणुकांमधून स्पष्ट झाले. उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला चांगलाच फटका बसला. काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीने कर्नाटकात पाचपैकी चार जागा जिंकून भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्याआधी उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या तीन पोटनिवडणुकांमध्येही समाजवादी पार्टी, बसपा आणि राष्ट्रीय लोकदल एकत्र आल्याने भाजपचा दारुण पराभव झाला होता. आगामी लोकसभा निवडणुकीतसुद्धा ही महाआघाडी कायम राहिल्यास भाजपसाठी धोकादायक ठरू शकते, हेच या पोटनिवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

भाजपच्या विरोधात समविचारी पक्ष एकत्र आल्यास भाजपला यश मिळत नाही, हा कल लक्षात घेऊन भाजपविरोधात समविचारी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आगामी निवडणुकीसाठी महाआघाडी स्थापन करण्याचे प्रयत्नही विरोधी पक्षांकडून सुरू आहेत. काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हेदेखील महाआघाडीसाठी मागील काही दिवसांपासून सक्रिय झाले आहेत. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू यांनीही त्यासाठी भर दिला आहे. विरोधक एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही कर्नाटकमधला पराभव गंभीरपणे घेत देशभरातल्या नाराज झालेल्या घटक पक्षांना पुन्हा एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पक्ष नेत्यांनी विविध राज्यांमधील आपल्या प्रदेशाध्यक्षांना यासंबंधी सूचित केले असून, त्यांच्या मागण्यांबाबतचा अहवाल पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सेनेशी जवळीक आहेच ती वाढेल

पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशाआधीच आमची सेना नेतृत्वाशी चर्चा सुरू आहे. आमच्या दोन्ही पक्षांची विचारधारा एकसारखी आहे. आगामी निवडणुकीत युती होईल ती शिवसेनेबरोबरच. यात कोणताही पर्याय नाही. काही गैरसमज आहेत ते दूर होतील, चर्चेतून मार्ग निघेल, पण युती होईल, हे नक्की.
– चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -