घरCORONA UPDATEलॉकडाऊन लवकर उठला नाही, तर लाखो भारतीय गरीब होतील - माजी RBI...

लॉकडाऊन लवकर उठला नाही, तर लाखो भारतीय गरीब होतील – माजी RBI गव्हर्नर!

Subscribe

देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, अजूनदेखील कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. देशभरात कोरोनाच्या रुग्णांसोबतच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधून लॉकडाऊन ३ तारखेनंतर देखील वाढवण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे लॉकडाऊनमुळे झालेल्या आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या नुकसानाचा आकडा देखील समोर येऊ लागला आहे. देशाचा विकासदर १ च्या आसपास राहील असा अंदाज आत्तापर्यंत वर्तवला जात होता. मात्र, आता तो शून्याच्याही खाली जाणार असल्याचं भाकित रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी वर्तवलं आहे. तसेच, जर लॉकडाऊन लवकर काढला गेला नाही, तर लाखो भारतीय गरीब होतील, असं देखील ते म्हणाले आहेत.

लाखो भारतीय गरीबीच्या खाईत!

मंथन फाऊंडेशनतर्फे ‘कोरोनानंतरच जग’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन परिसंवादात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘भारत इतर देशांपेक्षा कोरोनाविरुद्ध चांगला लढा देतोय यात शंका नाही. पण त्यानं समाधान होणारं नाही. कारण भारत एक गरीब देश आहे. आणि जर कोरोनाचं हे संकट असंच कायम राहिलं आणि लॉकडाऊन लवकर उठवण्यात आला नाही, तर देशातले लाखो लोकं गरीबीच्या खाईत लोटले जाण्याची दाट शक्यता आहे’.

- Advertisement -

याव्यतिरिक्त, भारताच्या विकासदराविषयी देखील त्यांनी मत व्यक्त केलं. ‘अनेत तज्ज्ञांनी भारतात शून्याच्याही खाली विकासदर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की कोरोनाचं संकट सुरू होण्याच्याही आधी २ महिने आपल्याकडे विकासदर संथ झाला होता. आता तर तो पूर्णपणे थांबला आहे. गेल्या वर्षीचा विकासदर ५ टक्के होता. या वर्षी तो वजा किंवा शून्य असणार आहे. थेट ५ टक्क्यांनी विकासदर घटणं म्हणजे तुम्ही अंदाज लावा किती नुकसान असेल’, असं सुब्बाराव म्हणाले.

भारताची अर्थव्यवस्था व्ही शेपमध्ये उसळी मारेल!

दरम्यान, यावेळी सुब्बाराव यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक सकारात्मक बाजू देखील सांगितली. ‘भारतीय अर्थव्यवस्था व्ही शेपमध्ये पुन्हा मार्गक्रमण करेल’ असं ते म्हणाले. व्ही शेप म्हणजेच अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसून ती वेगाने खालच्या बाजूने प्रवास करते आणि नंतर सुधारणा होऊन थेट व्ही आकारात वर उसळी घेते. याचं कारण देताना सुब्बाराव म्हणाले, ‘वादळ किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीसारखी कोरोना काही कंपन्या, कारखाने यांच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारी आपत्ती नाही. आपलं भांडवल उद्ध्वस्त झालेलं नाही. कारखाने जागेवरच उभे आहेत. दुकानंही जागेवरच आहेत. आपली लोकं लॉकडाऊन उठताच कामावर जाण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे आपण व्ही शेपनुसार खाली गेलेली अर्थव्यवस्था पुन्हा विकासाच्या मार्गाने वर आणू शकू’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -