घरदेश-विदेशकोरोनाच्या नव्या स्ट्रेनची धास्ती भारताने रोखली ब्रिटनची विमाने

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची धास्ती भारताने रोखली ब्रिटनची विमाने

Subscribe

जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार (स्ट्रेन) आढळून आला आहे. हा कोरोनाचा नवीन अवतार जगभरात धुमाकूळ घालण्या आधीच तो धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधून भारतात येणार्‍या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. या नव्या कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, भारत सरकार सतर्क असून चिंता करायचे कारण नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा हा नवा अवतार आढळून आला. त्यामुळे तेथे लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. या नव्या स्ट्रेनच्या धोक्यामुळे जगातील अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि ब्रिटनहून येणार्‍या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. सौदी अरेबिया, कॅनडा या देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नेदरलँड आणि बेल्जिअमने ब्रिटनमध्ये जाणार्‍या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.

- Advertisement -

भारत सरकारनेही ब्रिटनमध्ये जाणारी विमाने आणि तेथून भारतात येणार्‍या विमानांवर बंदी घातली आहे. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी भारत सरकार आवश्यक ती काळजी घेत आहे. या स्ट्रेनचे सध्या तरी भारतात रुग्ण आढळून आलेले नाहीत. मात्र, भविष्यात हा स्ट्रेन भारतात पसरू नये म्हणून आतापासूनच ब्रिटनच्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.

शेअर बाजार कोसळला ५ लाख कोटींचे नुकसान
कोरोनाच्या नव्या स्टे्रेनमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी शेअर बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी सेन्सेक्स तब्बल २ हजार अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीत ४०० अंकांची घसरण झाली आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे अवघ्या काही मिनिटांत तब्बल ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स ४६,९६० अंकांवर बंद झाला होता. त्यात सोमवारी सकाळीच २८ अंकांच्या घसरणीने बाजाराची सुरुवात झाली. दुपारपर्यंत सेन्सेक्समध्ये २ हजार रुपयांची घसरण होऊन ४४,९२३ अंकांवर जाऊन पोहोचला आहे. निफ्टीची परिस्थिती देखील वाईट आहे. शुक्रवारी १३,७६० अंकांवर बंद झालेल्या निफ्टीची सुरुवात आज सकाळी १९ अंकांच्या घसरणीने झाली होती. दुपारपर्यंत निफ्टी १३,१३१ इतका खाली कोसळला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -