घरदेश-विदेशTerror funding : लंडनमध्ये भारतीयाला जामीन नाकारला, कोठडीत रवानगी

Terror funding : लंडनमध्ये भारतीयाला जामीन नाकारला, कोठडीत रवानगी

Subscribe

लंडन : लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहला (Hezbollah) निधी पुरवत असल्याच्या आरोपावरून लंडनमध्ये एका भारतीयाला अटक करण्यात आली होती. दंडाधिकारी न्यायालयाने त्याला जामीन नाकारून 23 मे रोजी व्हिडीओ लिंकद्वारे त्याच न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. तोपर्यंत न्यायालयाने त्याची रवानगी कोठडीत केली. यूके आणि यूएसच्या संयुक्त कारवाईचा एक भाग म्हणून त्याला अटक करण्यात आली.

मदुराईत जन्मलेले सुंदर नागराजन (65) मंगळवारी वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयात (Westminster Magistrates’ Court) व्हिडीओ लिंकद्वारे हजर झाले. आपल्याविरुद्धचे फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे आरोप त्यांनी नाकारले असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले. सुंदर नागराजन (Sundar Nagarajan) हे हिंदू पार्श्वभूमीचे असून ते इस्लामिक दहशतवादाचे समर्थन करत नाहीत, असा युक्तिवाद न्यायाधीश ब्रिओनी क्लार्क यांच्यासमोर करण्यात आला. मात्र, न्यायाधीशांनी त्यांना जामीन देण्यास नकार दिला.

- Advertisement -

नागराजन यांना नागराजन सुंदर पूंगुलम काशीविश्वनाथन नागा आणि सुंदर पूंगुलम के नागराजन नागराजन म्हणूनही ओळखले जाते. अमेरिकेच्या विनंतीवरून 18 एप्रिल रोजी मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या राष्ट्रीय प्रत्यार्पण युनिटने (NEU) पश्चिम लंडनमधील हेस येथून त्यांना अटक केली होती. त्यांना अटक करण्यासाठी तसेच त्यांचे सामान जप्त करण्यासाठी सशस्त्र पोलीस अधिकारी त्यांच्या घरात घुसले होते, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. नागराजन हे हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या निधीशी संबंधित लेखापाल आहेत आणि अमेरिकन अधिकार्‍यांना फसवणूक आणि मनी लाँड्रिंग गुन्ह्यांसाठी ते हवे असल्याचे क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसने (CPS) अमेरिकन अधिकार्‍यांच्या वतीने न्यायालयाला सांगितले.

यापूर्वी, मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने दहशतवाद्यांना निधी पुरवल्याच्या संशयावरून नाझीम अहमद (50) या आणखी एका व्यक्तीला वेल्स येथून अटक केली होती. नॅशनल टेररिझम फायनान्सिंग इन्व्हेस्टिगेशन युनिटकडून (NTFIU) सुरू असलेला तपास आणि अटकसत्र हे दहशतवादासाठी होणारा वित्तपुरवठा आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित असल्याचे मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले. नाझीम हा हिरे व्यापारी आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतील प्रतिबंधित संघटना हिजबुल्लाहला निधी पुरवल्याचा अहमदवर संशय आहे. नजीम हा लेबनीज असून त्याच्याकडे बेल्जियम-लेबनीज असे दुहेरी नागरिकत्व आहे. यूके सरकारने गेल्या आठवड्यात नजीम अहमद आणि सुंदर नागराजन यांच्यासह त्यांच्या अनेक संशयित साथीदारांवर निर्बंध जाहीर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -