घरदेश-विदेशविधानसभेत पॉर्न पाहणारे झाले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री!

विधानसभेत पॉर्न पाहणारे झाले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री!

Subscribe

कर्नाटकमध्ये २०१२ साली गाजलेल्या विधानसभेतल्या पॉर्नगेट प्रकरणात अडकलेले लक्ष्मण सवदी आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

७ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ साली कर्नाटक विधानसभेमध्ये ‘पॉर्नगेट’ प्रकरण बरेच गाजले होते. कर्नाटकमधले भाजपचे एक आमदार विधानसभेचे अधिवेशन चालू असतानाच सभागृहातच मोबाईल पॉर्न पाहताना पकडले गेले होते. त्यांच्यावर बरीच टीका देखील झाली होती. भाजपच्या कर्नाटकमधल्या नेत्यांना या महाशयांमुळे मान खाली घालावी लागली होती. त्यांचं नाव लक्ष्मण सवदी. या प्रकरणावरून मोठा गदारोळ तेव्हा राज्य तसेच राष्ट्रीय माध्यमांमध्ये देखील झाला होता. मात्र, आता हेच लक्ष्मण सवदी त्याच विधानसभेमध्ये ताठ मानेनं प्रवेश करणार आहेत. आणि तेही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून! पॉर्नगेट प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री केल्यामुळे काँग्रेसने कर्नाटक भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

- Advertisement -

कर्नाटकचे १ मुख्यंमत्री आणि ३ उपमुख्यमंत्री!

नुकतीच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घोषणा केली की कर्नाटकला एक नव्हे तर तीन उपमुख्यमंत्री असतील. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच यातल्या लक्ष्मण यांच्या नावामुळे जास्तच चर्चा सुरू झाली. गोविंद करजोल, अश्वथ नारायण यांच्यासोबत लक्ष्मण सवदी यांचं नाव तिसरे उपमुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आलं. यानंतर काँग्रेसने तीव्र शब्दांमध्ये टिप्पणी केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातले वरीष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आहे. ‘हा प्रकार विधान भवनाबाहेर नसून विधान भवनात घडला होता. शिवाय सवदी हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. असं असतानाही त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं आहे. भाजपला लाज कशी वाटत नाही?’ असं सिद्धरामय्या म्हणाले आहेत. याशिवाय काँग्रेस नेते दिनेश गोंडू यांनी देखील टीका करताना, ‘हे (भाजप) सरकार म्हणजे कॉमेडी आहे. जेलमधून परतलेले येडियुरप्पा मुख्यमंत्री आहेत आणि विधानसभेत पॉर्न पाहणारे उपमुख्यमंत्री आहेत’, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

काय आहे पॉर्नगेट प्रकरण?

७ फेब्रुवारी २०१२ रोजी कर्नाटक विधानसभेचं अधिवेश सुरू असताना विधानसभेतच भाजपचे आमदार लक्ष्मण सवदी मोबाईलवर पॉर्न पाहण्यात मश्गुल असल्याचं दिसून आलं होतं. सभागृहाचं कामकाज कव्हर करण्यासाठी गॅलरीत बसलेल्या काही माध्यम प्रतिनिधींच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर हा सगळा प्रकार राज्यातल्या आणि देशभरातल्या माध्यमांमध्ये बराच चर्चेत आला होता. धक्कादायक बाब म्हणजे सवदी यांच्यासोबत हा व्हिडिओ पाहणारे आमदार सी. सी. पाटील हे तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री होते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -