महाराष्ट्रातील गनिमी कावा, युद्धनितीचा गडकिल्ले, कातळशिल्पांचा UNESCO कडून स्वीकार

नामांकनाचा अंतिम प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु

Maharashtra fort UNESCO

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, महाराष्ट्राचे सैनिकी स्थापत्य आणि गनिमी कावा युद्धनीती तसेच कोकणातील कातळशिल्पे या संकल्पना जागतिक वारसा म्हणून  युनेस्कोने स्वीकार केला आहे. आता या नामांकनाचा अंतिम प्रस्ताव तयार करण्याचे काम राज्याच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत सुरु झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे युध्दातील गनिमी काव्याचे तंत्र आणि स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या गडकिल्ल्यांना तसेच कोकणातील कातळशिल्पांना  जागतिक वारसा स्थळ घोषित करण्याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आला होता. राज्याच्या या प्रस्तावाला युनेस्कोने तत्वतः मान्यता दिली आहे.

आतापर्यंत राज्य सरकारद्वारे संरक्षित एकही स्मारक युनेस्को द्वारा जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले नव्हते. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनेचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार झाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला  आहे.

राज्यातील राजगड, साल्हेर, मुल्हेर, अंकाई,टंकाई, खर्डा, गाळणा इत्यादी किल्ले तर सिंदखेड राजा येथील स्मारके, भीमाशंकर सुंदर नारायण नीरा नरसिंगपूर येथील मंदिरांचे जतन संवर्धन आता प्रगतिपथावर आहे. येथील संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळातील  संग्रहालयाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतिपथावर आहे. सातारा येथील शस्त्र संग्रह, नागपूर आणि औंध येथील चित्र संग्रह इत्यादींच्या हाय रेझोल्यूशन फोटोग्राफीचे काम कोरोना काळात पूर्ण झाले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनेचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार होणे ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे’

अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री