कोणताच पक्ष एकसंध नाही, प्रत्येकात गटबाजी; भाजपाचा दाखला देत शशी थरुरांचं विधान

shashi tharoor

जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव संपूर्ण देशाला माहिती आहे. यावरूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोठं भाष्य केलं आहे. प्रत्येक पक्षात छोटे छोटे गट असतातच. मात्र, नेत्यांनी सामूहिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावं, असं शशी थरुर म्हणाले. तसंच, भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारत असल्याचंही ते म्हणाले. जयपूर येथील लिटरेचर महोत्सवात ते बोलत होते.

शशी थरूर म्हणाले की, भारतात असा एकही राजकीय पक्ष नाही ज्यात गट नाहीत. भाजपमध्ये (भारतीय जनता पक्ष) वैचारिक मतभेद नाहीत का? लोकशाहीत दोन व्यक्तींचे विचार वेगवेगळे असू शकतात, पण तुमची विचारधारा एक असेल आणि समानतेसाठी लढत असाल तर पक्ष काय म्हणतो, तेच घडते. प्रत्येक पक्षात काही छोटे गट आहेत हे खरे आहे, पण मोठी गोष्ट म्हणजे आपण सगळेच भाजपाविरोधात आहोत. मोठ्या समस्यांच्या तुलनेत या छोट्या गोष्टी आहेत.”

हेही वाचा – शशी थरुर अडचणीत, सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलीस हायकोर्टात

काँग्रेस नेते सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात पक्षांतर्गत वाद आहेत. हे वाद सातत्याने उफाळून येतात. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट यांनी अशोक गहलोतांवर टीकाही केली होती. यावरून शशी थरुर यांनी सचिन पायलट यांना सल्ला दिला आहे. “जेव्हा आपण आपल्या मित्रपक्षांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपले शब्द विचारपूर्वक वापरावे. मला अभिमान आहे की, माझ्या १४ वर्षांच्या राजकीय आयुष्यात मी असा शब्दही कोणाशी बोललो नाही.”

ते पुढे म्हणाले की, मी माझ्या सहकार्‍यांना आवाहन करतो की, आपल्या सहकाऱ्यांबद्दल असे बोलणे योग्य नाही. अर्थात, आपण आपले म्हणणे वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो किंवा खासगीतही आपण आपलं मत देऊ शकतो.

सचिन पायलट काय म्हणाले होते?

शुक्रवारी सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवत ज्येष्ठांनी तरुण पिढीचा विचार केला पाहिजे आणि तरुणांना न्याय मिळाला पाहिजे, असे म्हटले होते. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत पायलट म्हणाले की, आर्डर्न यांना आठ वर्षांपूर्वी सर्वोच्च पदावर नियुक्त करण्यात आले होते, परंतु सार्वजनिक मान्यता कमी झाल्यामुळे त्यांनी पद सोडले आणि त्याऐवजी त्यांच्या पक्षासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. तसंच, काही दिवसांपूर्वी अशोक गहलोत यांचा एक व्हिडीओही समोर आला होता. या व्हिडीओमध्ये अशोक गहलोत यांनी कोरोना विषाणूची तुलना सचिन पायलट यांच्याशी केली होती. यावरूनच शशी थरुर यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा – चलो राणीबाग… लॉकडाऊननंतर बागेत अवतरणार कार्टून्सची दुनिया

राहुल गांधींची प्रतिमा सुधारतेय

राहुल गांधी एक दिवस धरणे करायचे आणि मग दुसऱ्या दिवशी परदेशात पळून जायचे, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने ते खंबीरपणे उभे असून गेल्या १६० दिवसांपासून अविरत चालत आहेत. राहुल गांधी गर्विष्ठ असल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सर्व प्रकारचे, सर्व वर्गातील लोक त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. तसंच, राहुल गांधी राजकारणी नसल्याचाही आरोप करण्यता आला होता. यावर शशी थरुर म्हणाले की, राहुल गांधींनी आतापर्यंत डझनभर पत्रकार परिषदा घेतल्या. पंतप्रधानांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या?” यावरून राहुल गांधींची प्रतिमा बदलतेय असंही शशी थरुर म्हणाले.