शरद पवार कर्नाटकच्या मित्राला म्हणतात, बेळगाव द्या आणि प्रश्न संपवा!

sharad pawar

पुणे – महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सध्या हे प्रकरणावरील दोन्ही राज्यातील वाद थांबला आहे. मात्र, कर्नाटकातील बेळगाव महाराष्ट्रात घेण्याचा चंग महाराष्ट्रातील नेत्यांनी बांधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज त्यांच्या बेळगावातील एका मित्राला मिश्किल टिप्पणी करत मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा असं म्हटलं आहे. ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते.

पिंपरी चिंचवड येथे एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णालयाचे अध्यक्ष प्रभाकर कोरे हे मुळचे बेळगावचे असून ते शरद पवारांचे चांगेल मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभाकर कोरे यांनी म्हटलं की, शरद पवार सतत बेळगाव कधी देणार, साहेब आम्ही मुंबई प्रांतातील आहोत. माझ्या सर्व संस्था या मुंबईत आहेत. म्हणून मी साहेबांना म्हणत असतो, घ्यायचे असेल तर पूर्ण कर्नाटक घ्या, बेळगाव नको.

प्रभाकर कोरे यांचा हाच धागा पकडत शरद पवारांनीही मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले की, प्रभाकर कोरे यांनी नवीन काही केले की ते मला उद्घाटनाला बोलावतात. मग ते कर्नाटकमध्ये असो की महाराष्ट्रात. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. म्हणून मी नेहमी डॉ.प्रभाकर यांना सांगतो की, मी तुमची इतकी उद्घाटने केली. मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका. पण ते नेहमी सांगतात की अख्खा कर्नाटक तुम्ही, पण बेळगावची मागणी करू नका.


महाराष्ट्र कर्नाटक जुने संबंध – फडणवीस

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे खूप जुने संबंध आहेत. तसेच मराठी आणि कन्नड या दोन्ही प्राचीन आणि समृद्ध भाषा आहेत. दोन्ही भाषेतील साहित्य नागरिकांना दिशा देणारं आहे. त्यामुळे जेव्हा मला कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं, तेव्हा मी लगेच हे निमंत्रण स्वीकारलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते काल कर्नाटकच्या चिक्कमंगळुरू येथे सांस्कृतिक महोत्सवात बोलत होते.