घरताज्या घडामोडीचलो राणीबाग… लॉकडाऊननंतर बागेत अवतरणार कार्टून्सची दुनिया

चलो राणीबाग… लॉकडाऊननंतर बागेत अवतरणार कार्टून्सची दुनिया

Subscribe

मार्च २०२० पासून कोरोनाच्या संसर्गामुळे राणीच्या बागेत दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या झाडे, फुले व भाज्यांच्या प्रदर्शनात खंड पडला होता. मात्र आता दोन वर्षांच्या खंडानंतर कोरोना नियंत्रणात आल्याने व लॉकडाऊन निर्बंध उठवल्याने पुन्हा एकदा राणीच्या बागेत भाज्या, झाडे व फुलांचे भव्य प्रदर्शन (२६ वे) २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

- Advertisement -

या प्रदर्शनाच्या निमित्ताने, अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. या पाहुण्यांमध्ये, बच्चे कंपनीची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध कार्टून्स! विशेष म्हणजे ही सर्व कार्टून्स पानाफुलांपासून साकारली जाणार आहेत. अनेक ‘सेल्फी पॉइंट’ देखील यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत.यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत.

- Advertisement -

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित यंदाच्या उद्यान प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण असणार आहे ते म्हणजे फुलांपासून साकारलेले ‘जी २०’ चे बोधचिन्ह. त्याचबरोबर ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे फुले आणि भाज्या यांचा समावेश देखील यंदाच्या उद्यान प्रदर्शनात असणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

या उद्यान प्रदर्शनाचे उद्घाटन पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी रोजी सकाळी होणार आहे. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर ५ फेब्रुवारी रोजी होणा-या समारोपीय कार्यक्रम देखील मान्यवरांची उपस्थित असणार आहे. यंदाच्या प्रदर्शनाचा शुभारंभ २ फेब्रुवारी रोजी सकाळी होणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत; तर ४ फेब्रुवारी व ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

मध्यवर्ती संकल्पना

वर्ष २०१६ पासून एका मध्यवर्ती संकल्पनेवर उद्यान प्रदर्शनी आयोजित करण्यात येत आहे. वर्ष २०२० मध्ये मुंबईच्या मानबिंदूंच्या आकर्षक प्रतिकृतींचा समावेश उद्यान प्रदर्शनात करण्यात आला होता. यामध्ये गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, भारतातील पहिली ट्राम, कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी, भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रतीक असणारा फिल्म शूटिंग कॅमेरा यासारख्या प्रतिकृती पानाफुलांपासून साकारण्यात आल्या होत्या.

वर्ष २०१९ मध्ये ‘संगीत आणि वाद्य’ या मध्यवर्ती संकल्पेनवर आधारित उद्यान प्रदर्शनात पाना-फुलांपासून तयार केलेली सनई, बासरी, गिटार, तबला, वीणा, सितार, संवादिनी (हामोर्नियम) इत्यादी वाद्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. तर, सन २०१८ च्या प्रदर्शनात ‘जलचर’ या मध्यवर्ती संकल्पनवर आधारित जलपरी, डॉल्फीन, स्टारफीश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा इत्यादींच्या प्रतिकृती होत्या.

वर्ष २०१७ मध्ये मिकीमाऊस, डोरेमॉन, डोनाल्ड डक यासारख्या लहान मुलांच्या आवडत्या ‘कार्टुन्स’च्या प्रतिकृती प्रदर्शित करुन मध्यवर्ती संकल्पना साकारण्यात आली होती. तर मध्यवर्ती संकल्पेनवर आधारित पहिल्या उद्यान प्रदर्शनात ‘स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई’ ही मध्यवर्ती संकल्पना होती. वर्ष २०१६ मध्ये आयोजित या उद्यान प्रदर्शनात पाना फुलांचा वापर करुन तयार केलेल्या स्वच्छता विषयक साहित्य व वाहनांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सन २०२१ आणि २०२२ मध्ये कोविड प्रादुर्भावामुळे वार्षिक उद्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले नव्हते.

प्रदर्शनाला वाढता प्रतिसाद

वर्ष २०१६ मध्ये सुमारे ५० हजार मुंबईकरांनी वार्षिक उद्यान प्रदर्शनाला भेट दिली होती. वर्ष २०१७ मध्ये ७५ हजारांपेक्षा अधिकांनी; तर वर्ष २०१८, तर वर्ष २०१९ आणि २०२० मध्ये तब्बल दीड लाख नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती.


हेही वाचा : तांबे पिता-पुत्रांच्या निर्णयामुळे थोरातांचे खच्चीकरण, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -